Mon, Aug 03, 2020 15:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशभरात सहा वर्षांत तीन हजार वाघांची शिकार

देशभरात सहा वर्षांत तीन हजार वाघांची शिकार

Last Updated: Jan 15 2020 1:47AM
मुंबई : चंदन शिरवाळे

राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळख असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अभियान राबवत असले तरी विविध राज्यांमध्ये वाघांच्या हत्या सुरुच आहेत. 2012 ते 2018 या कालावधीमध्ये देशात 2 हजार 967 वाघांच्या हत्या झाल्या आहेत. तर 2019 या एका वर्षांत 110 वाघ आणि 491 बिबट्यांची शिकार झाली आहे. पण आतापर्यंत एकाही शिकार्‍याला अटक केली नाही.

13 लोकांचा बळी घेतल्याचे सांगत यवतमाळमधील बोराटी या गावात वन अधिकार्‍यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये अवनी या वाघीणिला गोळ्या घातल्या. पण ही हत्या असून यामागे षढयंत्र असल्याचे अवि फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष डॉ. जेरी बनैट यांनी सरकार-दरबारी कळवले आहे. अवनीनेच 13 लोकांचा बळी घेतल्याचा एकही पुरावा वन अधिकार्‍यांनी दिला नाही. याबाबत डॉ. बनैट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मंत्रालयात नुकतीच भेट घेतली असता, अवनीच्या मृत्युची फेरचौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

डॉ. बनैट म्हणाले, वाघांच्या हत्या रोखण्यासाठी शिकार्‍यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पण वन विभाग आणि शिकार्‍यांचे आर्थिक संबध असल्यामुळे आतापर्यंत एकही शिकारी कोणी पाहीला नाही. राज्यात आदिवासी तर मध्यप्रदेशमधील बहेलीया ही जमात वाघांच्या शिकारीमध्ये तरबेज आहे. वीजेची शॉक, विष प्रयोग किंवा जाळ्यांच्या आधारे वाघांच्या हत्या केल्या जातात.
पश्‍चिम बंगाल, नेपाळमार्गे वाघांचे अवयव चिनला पाठवले जाते.उत्तेजक द्रव्य व काही औषधनिर्मीतीसाठी वाघांच्या अवयवांचा वापर केला जातो. चिनपर्यंत अवयव पोहचेपर्यत किमान 30 ते 35 जणांनी टप्प्याटप्प्याने त्याची विक्री केलेली असते. कोणी किती रुपयांना अवयव खरेदी केले हे कोणालाही सांगितले जात नाही. चिनमध्ये हे अवयव पोहचेपर्यंत त्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत झालेली असते. राज्यातील आदिवासी शिकार्‍यांना मृत वाघांच्या बदल्यात केवळ 10 ते 12 हजार रुपये मिळतात.

आंतरराष्ट्रीय वन्य जीवरक्षक संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला लाखो रुपये येतात. केंद्र सरकारही राज्यांना वाघांच्या सुरक्षेसाठी निधी देते. पण त्याचा वापर योग्य कारणासाठी केला जात नाही, अशी खंतही डॉ. बनैट यांनी व्यक्त केली.

2012 ते 2018 दरम्यान वाघांच्या हत्या

महाराष्ट्र 107, मध्यप्रदेश 142, कर्नाटक 99, उत्तराखंड 82, तामिळनाडू 47, आसाम 44, उत्तरप्रदेश 31, राजस्थान 14, छत्तीसगड व पश्‍चिम बंगाल प्रत्येकी 9. इतर राज्यातही वाघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे.