राजस्थानच्या पार्श्‍वभूमीवर थोरात-ठाकरे यांची चर्चा, पवारही भेटले

Last Updated: Jul 14 2020 1:41AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाच्या पार्श्‍वभूमीवर सावधगिरी म्हणून महाराष्ट्रात आघाडीतील भागीदार असलेल्या काँग्रेसशी संवाद साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे. विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्‍त बारा जागा भरण्याच्या हालचाली नव्याने सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही मुख्यमंत्र्यांना भेटले.

बाळासाहेब थोरात यांनी भेट मागितल्याबरोबर मुख्यमंत्री त्यांना भेटले. दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही भेट झाली. विधान परिषदेच्या जागा भरण्याबरोबरच महसूल खात्यातील बदल्यांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील चर्चेवेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. थोरात यांच्यानंतर लगेचच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. थोरात यांच्याशी झालेल्या बोलण्याबाबत पवार-ठाकरे यांच्या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.