Wed, Aug 12, 2020 21:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहुप्रतीक्षित रो-रो जहाज मुंबईत

बहुप्रतीक्षित रो-रो जहाज मुंबईत

Last Updated: Feb 15 2020 1:58AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई ते मांडवा प्रवास तीन तासांवरून एका तासावर आणणारे रोरो सेवा प्रकल्पातील पहिले जहाज शुक्रवारी मुंबईच्या किनार्‍याला लागले. कस्टमच्या परवानगीनंतर या जहाजाची चाचणी घेतली जाईल आणि  या महिन्याअखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जहाजाचे उद्घाटन होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे.

28 जानेवारीला ग्रीसवरून निघालेले रोरो जहाज शुक्रवारी व्हॅलेन्टाईनडेच्या मुहूर्तावर गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. जहाजाची नोंदणी दोन ते तीन दिवसांत होईल. त्यानंतर जहाजाची चाचणी होईल.

मुंबई ते अलिबाग अंतर कापण्यासाठी चारचाकी चालकांना लागणारा तीन तासांचा अवधी अवघ्या तासाभरावर येऊन ठेपणार आहे. परिणामी, इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.

मुंबई ते मांडवा दरम्यान दरवर्षी सुमारे 20 लाख प्रवासी छोट्या जहाजांच्या मदतीने ये-जा करतात. यामध्ये काही प्रवाशांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागतो. त्यात मुंबईहून चारचाकीने अलिबाग गाठण्यासाठी वेळेसह इंधनाचीही नासाडी होते. रोरो प्रकल्पामुळे या सर्वच मनस्तापातून मुंबईकर व अलिबागकरांची सुटका होणार आहे.

रोरो प्रकल्पातील तिकिट दर निश्?चित झाले नसले, तरी चारचाकींच्या वाहतुकीसाठी किमान एक हजार रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. तर सर्वसामान्य प्रवाशांना रोरोने प्रवास करण्यासाठी 225 ते 250 रुपये मोजावे लागू शकतात. उद्घाटनापुर्वी प्रवासी आणि वाहनांसाठी आकारण्यात येणार्‍या शुल्कावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टमधील एका अधिकार्‍याने पुढारीला दिली.

चांगल्या वातावरणात 1 हजार प्रवासी, तर खराब वातावरणात 500 प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता या जहाजाची आहे. या जहाजावर 200 चारचाकी देखील वाहून नेता येतील.