Thu, Aug 13, 2020 16:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाला सवलती देण्याबाबत शासन सकारात्मक

मराठा समाजाला सवलती देण्याबाबत शासन सकारात्मक

Last Updated: Jul 09 2020 1:03AM

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर केलेल्या; परंतु प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हे उपसमितीच्या बैठकीत सांगितले.

मराठा आरक्षण, ‘सारथी’ आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर गुरुवारपासून तीन दिवस मॅरेथॉन बैठका होणार असल्याचे ते म्हणाले. उपसमितीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. त्याबरोबरच समितीचे सदस्य नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, बहुजन कल्याणमंत्री विजय वड्डेटीवार, विधी विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे यांच्यासह न्यायालयात राज्य शासनाची बाजू मांडणारे विधिज्ञ उपस्थित होते.

येत्या बुधवारी दि. 15 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार्‍या सुनावणीसंदर्भात भक्‍कमपणे बाजू मांडण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येत्या दोन -तीन दिवसांत मराठा आरक्षणासंदर्भात विविध बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये मराठा समाजाशी संबंधित विविध योजना व सवलती, त्यांची अंमलबजावणी तसेच न्यायालयीन कामकाजाच्या तयारीबाबत विचारविनिमय केला जाणार आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षण व वैद्यकीय प्रवेशासंदर्भात बुधवारी होणार्‍या सुनावणीमध्ये राज्य शासनाची बाजू भक्‍कमपणे मांडली जाईल. वैद्यकीय प्रवेशाला अंतरिम स्थगिती मिळू नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील मूळ याचिकेवरील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगऐवजी प्रत्यक्ष व्हावी, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ‘सारथी’ आणि इतर अनेक विषयांसंदर्भात गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत.