महाडमधील पूर परिस्थिती कायम (video)

Last Updated: Aug 05 2020 10:11AM
Responsive image
महाडमधील पूर


महाड : पुढारी वृत्तसेवा 

गेल्या चोवीस तासांपासून महाड-पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस रात्रभर कायम असून महाड शहरातील पूर परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र सकाळी केलेल्या पाहणीत आढळून आले. महाडमधील पूर परिस्थितीवर नगरपालिका प्रशासनासह स्थानिक प्रशासन लक्ष ठेऊन असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून सागरी सुरक्षा दलाचे एक पथक महाड येथे दाखल झाले आहे.

राज्यात आणखी २३१ पोलिसांना कोरोनाची लागण

दरम्यान, महाड तालुक्यातील ग्रामीण भाग व पोलादपुरात तुफानी मुसळधार पाऊस सुरु आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत सावित्री नदीचे पाणी अमर पेये ते विठ्ठल मंदिर या परिसरामध्ये घुसले असून त्याचा अजूनही निचरा झालेला नाही. तर शहरातील दस्तुरी नाका, दादली पूल, गांधारी नाका, मच्छीमार्केट, गाडीतळ, उभा मारुती परिसरामध्ये पुराचे पाणी कायम आहे. गेल्या २४ तासांत १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आजपावेतो सुमारे १४५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यातील कशेडी व महाबळेश्वर घाटामध्ये होत असणारा तुफानी पाऊस पाहता या मार्गावरील वाहतुकीसाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय केल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांतसिंग राजपुत प्रकरणावर मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले...

महाडच्या बिरवाडी, वाळण, रायगड, विन्हेरे, दासगाव, खाडी पट्टा  या भागात रात्रभर झालेल्या पावसाने शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी छोट्या पुलावरून पाणी वाहू जाऊ लागल्याने रेवतळे, मुमुर्शी, सांदोशी, पाने आदी भागातील नागरिकांचा संपर्क मुख्य शहरांपासून तुटला आहे.

शाळांची घंटी १ सप्टेंबरपासून वाजणार

आगामी चोवीस तास होणारा मुसळधार पाऊस लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारीचे उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महाडनगर परिषद स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आपत्ती प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षेकरता जिल्हा प्रशासनाकडून सागरी सुरक्षा दलाचे एक पथक महाड येथे दाखल झाले असल्याची माहितीही तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. तसेच महाडनगर परिषदेचे प्रशिक्षित कर्मचारी दोन होड्यांसह शहरातील पुराचे पाणी असलेल्या सखल भागात तैनात करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली आहे.