मुंबईकरांना मोठा दिलासा! कोव्हिशिल्ड लसीचा पहिला साठा दाखल

Last Updated: Jan 13 2021 10:05AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली लस पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी देशातील विविध राज्यांमध्ये कालपासून पाठविण्यात येत आहे. आज पहाटे मुंबईमध्ये महाराष्ट्रासाठी असणाऱ्या लसीचे डोस मुंबई महापालिकेच्या विशेष वाहनातून पुण्याहून आणण्यात आले. मुंबईकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. (The first consignment of #Covishield by Serum Institute of India arrived in Mumbai. The vaccine was brought from Pune in a special vehicle of BMC) 

देशात कोव्हिड लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरु होत आहे. पहिल्या टप्यात कोव्हिड योद्धयांना ही लस देण्यात येणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने आणि हैद्राबाद स्थित भारत बायोटेकने तयार केलेली लस  देशभरात वितरित करण्यात येत आहे. दूरवरच्या ठिकाणी लस पोहचविण्यासाठी विमान वाहतुकीचे साहाय्य घेण्यात आले आहे. तर दुर्गम ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एकूण साडेआठ लाख लाभार्थी असून, त्यांना दोन टप्प्यांत १७ लाख डोसची आवश्यकता आहे. मात्र, राज्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘सिरम’कडून ९ लाख ६३ हजार डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना डोस न देता फक्त ५५ टक्केच कर्मचार्‍यांना डोस देण्यात येणार आहे. त्यांनाच २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.