Sat, May 30, 2020 01:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रेल्वे'पाठोपाठ 'एसटी'च्याही भरतीचा बनावट मेसेज व्हायरल

'रेल्वे'पाठोपाठ 'एसटी'च्याही भरतीचा बनावट मेसेज व्हायरल

Last Updated: Feb 25 2020 1:44AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

रेल्वे सुरक्षा बलामध्ये (आरपीएफ) भरती असल्याची खोटी जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर आता एसटी महामंडळामध्ये भरती असल्याचा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेपाठोपाठ एसटीत रिक्त पदांसाठी असलेल्या भरतीच्या खोट्या जाहिरातीमुळे बेरोजगार तरूणांसह प्रशासनालाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

आरपीएफमध्ये १९ हजार ९५२ कर्मचार्‍यांची भरती निघाली आहे, असा मेसेज फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला. या जाहिरातीमध्ये सरकारी जाहिरातीचे खोटे पत्र व्हायरल होत होते. मात्र अशा कोणत्याही प्रकारची भरती निघाली नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या आरपीएफ विभागाने स्पष्ट केले आहे. तरूणांनी अशा कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावरून भरतीचे अर्ज भरू नये, यासह कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये, असे रेल्वे प्रशानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वेकडून खोट्या भरतीवर खुलासा होत असतानाच सोमवारी एसटी महामंडळात चालक व वाहक पदांच्या ३ हजार ६०६ रिक्त पदांसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज करावे, असा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एसटी महामंडळाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, अशी कुठलीही भरती प्रक्रिया एसटी महामंडळाने सुरू केलेली नसल्याचे एसटीच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र रेल्वे आणि एसटीमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याचे खोटे मेसेज व्हायरल होत असल्याने यासंदर्भात बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, सायबर पोलिसांनी अशा खोट्या मेसेजचा पाठपुरावा करून निरपराध बेरोजगारांची फसवणूक होण्याआधी दोषींविरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.