होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : वाडा - पिवळी बसला भीषण अपघात

ठाणे : वाडा - पिवळी बसला भीषण अपघात

Published On: Aug 13 2019 1:38PM | Last Updated: Aug 13 2019 1:38PM

बस ला भीषण अपघातवाडा (ठाणे)  : प्रतिनिधी

पिवळी ते वाडा या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला आज, मंगळवारी (ता. १३) सकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ५७ प्रवाशांसह विद्यार्थी होते. सर्व प्रवाशांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोन प्रवाशांना ठाणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर, अन्य सर्व जखमींवर वाडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ६ ते ७ विद्यार्थी वैद्यकीय देखरेखीखाली असल्याची माहिती डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.

मंगळवारी महामंडळाची बस नेहमी प्रमाणे सकाळी ६.१५ ला पिवळी येथून वाड्याच्या दिशेने रवाना झाली, मुळात बस चालक भरधाव वेगात होता, असे विद्यार्थी सांगतात. त्या दरम्यान ७ च्या सुमारास वाडा तालुक्यातील जांभूळपाडा येथे आली असता गतिरोधकावर आदळून ही बस सरळ रस्त्याकडेला उतरली. 

अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे बेसावध प्रवाशी खाली कोसळले. यात जवळपास ५७ विद्यार्थी व प्रवासी होते जे जखमी झाले. यापैकी रावमी प्रसाद (वय ३८) व सुमन प्रसाद (३७) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. इतर ४९ जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यातील अनेक विद्यार्थ्यांना तोंड, डोके,  तसेच हातपायाला इजा झाली आहे. अनेकांना गंभीर मार लागल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. 

एसटी महामंडळाकडून जखमींना तात्काळ एक हजार प्रमाणे मदत करण्यात येईल व यानंतर अहवाल बनवून त्यानुसार आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच चालक भरधाव वेगात असून त्यामुळेच अपघात घडल्याने चालक काशिनाथ जाधव यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व चालकांना सतर्कपणे वाहन चालविण्याच्या सूचना यापुढेही देण्यात येतील अशी माहिती आगार व्यवस्थापक एम. आर. धांगडा यांनी दिली.