Mon, Sep 21, 2020 12:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'एन्काउंटर करतील हवाई मार्गेच कानपूरला न्या' (video)

'एन्काउंटर करतील हवाई मार्गेच कानपूरला न्या' (video)

Last Updated: Jul 12 2020 3:59PM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेश मधील कुख्यात गुंड विकास दुबेचे साथीदार अरविंद त्रिवेदी उर्फ गुड्डण रामविलास त्रिवेदी आणि सुशील कुमार एलिस सोनू सुरेश तिवारी या दोघांना शनिवारी ठाण्यातून अटक करण्यात आली होती. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश रश्मी झा यांनी दोघा आरोपींना 21 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघा आरोपींना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार असून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसचे पोलिस निरीक्षक दया नायक यांनी यावेळी पत्रकारांना दिली. 

अधिक वाचा : ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

दरम्यान, दोघांना गाडीतून कानपूर येथे न घेऊन जाता हवाई मार्गे विमानातून लखनऊ एयरपोर्टला नेण्यात यावे अशी मागणी अटकेतल्या आरोपीचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात एका लेखी अर्जाद्वारे केली आहे. विकास दुबे चकमकीच्या घटनेमुळे दोघेही आरोपी भयभीत झालेले असूनए, आपल्या जीवाचे बरेवाईट होईल अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे दोघांना फक्त हवाई मार्गेच उत्तर प्रदेश येथे नेण्यात यावे असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. ठाणे न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा हा अर्ज रेकॉर्डवर ठेवला असून, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय सूनावलेला नाही. 

अधिक वाचा : राजभवनात कोरोनाची एन्ट्री; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केला स्पष्ट खुलासा!

सध्या दोघा आरोपींना तळोजा तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तेथे त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल. त्यानंतर या दोघांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती एटीएसचे पोलिस निरीक्षक दया नायक यांनी पत्रकारांना दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉन्टेड होता. त्याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. यातले दोघे ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी ठाण्यातील कोलशेत -ढोकाळी परिसरातील एका चाळीतून दोघांना नायक व त्यांच्या पथकाने अटक केली होती.

 "