मुंबई : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करू नये त्यांनी महाराष्ट्राची आणि कोरोना रुग्णांची काळजी करावी, असे प्रत्युत्तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भिवंडी येथे दिले. कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते भिवंडीत आले होते. ज्यांना उपचार मिळत नाहीत अशा कोरोना रुग्णांचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी विचारला असता, मला अधिक आनंद झाला असता असे फडणवीस म्हणाले.
विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आत्ताच सुरू झाले आहे. सरकारने शिफारस केलेले हे 12 आमदार विधान परिषदेत जाऊ नये असे भाजपला वाटत आहे असे संजय राऊत म्हणाले होते. भाजपला दूर ठेवून तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण? आणि त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय? असेही राऊत यांनी म्हटले होते.