Wed, May 27, 2020 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तारक मेहता वाद; 'या' अभिनेत्याचा माफीनामा

तारक मेहता वाद; 'या' अभिनेत्याचा माफीनामा

Last Updated: Mar 04 2020 11:09AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा नवा वाद उद्भवला आहे. तारक मेहतामध्ये नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दाखवण्यात आले होते. यातील कलाकार अमित भट यांनी बापूजी चंपक लाल यांची भूमिका साकारली आहे. गोकुळधाममधील राडा थांबवण्यासाठी बापूजींनी मध्यस्थी केली. यावेळी बापूजींच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी, असा संवाद दाखवण्यात आला. या संवादानंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून या मालिकेच्या एपिसोडविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आता या मालिकेतील बापूजीची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भटने लेखी पत्राद्वारे माफी मागितली आहे.  

वाचा - मुंबईची भाषा हिंदी म्हणणाऱ्या 'तारक मेहता'वर निर्मात्याचे स्पष्टीकरण

मनसेने मालिकेतील संवादाबाबत आक्षेप घेतल्यानंतर तारक मेहतामध्ये काम करणारे अमित भटने पत्र लिहून लेखी माफी मागितली आहे. त्याने पत्रात लिहिले आहे, 'मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशः दखल घेईन. वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल की विनंती...'

वाचा - हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता, अमेय खोपकर यांचा संताप 

अमित भटने हे पत्र राज ठाकरे यांना लिहिले आहे. आणि दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आहे.