Thu, Dec 03, 2020 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टीआरपी घोटाळा; अभिषेकला अटक

टीआरपी घोटाळा; अभिषेकला अटक

Last Updated: Oct 27 2020 1:35AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स (टीआरपी) फेरफार घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिषेक कोलवडे ऊर्फ अजित ऊर्फ अमित ऊर्फ महाडिक याला अटक केली. अटक होणारा अभिषेक दहावा संशयित आहे.
पैसे देऊन टीआरपी वाढवणार्‍या रॅकेटचा गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने याप्रकरणी विशाल भंडारी (21) याच्यासह बोमपेली मिस्त्री (44), नारायण शर्मा (47), शिरीष पत्तनशेट्टी (44), विनय त्रिपाठी, उमेश मिश्रा, रामजी वर्मा (41), दिनेशकुमार विश्वकर्मा (37) आणि हरीष पाटील यांना अटक केली आहे.

अभिषेक याच्यासह रामजी आणि दिनेशकुमार आणि हरीष यांना गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात हजर केले. घोटाळ्यातील या आरोपींनी महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक टीव्ही चॅनेल जास्त वेळ पाहण्यासाठी संबंधित मालक आणि चालक तसेच या चॅनेल्सच्या पदाधिकार्‍यांकड़ून पैसे स्वीकारून ते बॅरोमीटर असलेल्या घरातील लोकांना दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

गुन्ह्यात अटक आणि पाहिजे आरोपी यांच्यातील आर्थिक गैरव्यवहाराबाबतचे पुरावे सापडले आहेत. तर, याप्रकरणी अटकेत असलेल्या हरीष याचे अभिषेकच्या मॅक्स मीडिया कंपनीच्या बँक खात्यात संशयास्पद देवाण-घेवाण झाल्याचेही समोर आले आहे. अभिषेकच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी संबंधित वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यामुळे रिपब्लिकच्या अडचणीत वाढ झाली आहे.