Wed, Sep 23, 2020 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाळीव कुत्र्याच्या बेल्टने आवळला सुशांतचा गळा

पाळीव कुत्र्याच्या बेल्टने आवळला सुशांतचा गळा

Last Updated: Aug 09 2020 1:02AM
मुंबई/नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्याचा माजी सहायक अंकित आचार्य याने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, सुशांतने आत्महत्या केली नसून, फज नावाच्या पाळीव कुत्र्याच्या बेल्टने त्याचा गळा आवळण्यात आला असल्याचा धक्‍कादायक आरोप केला आहे.

एकीकडे सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, दुसरीकडे सुशांतच्या जवळच्या व्यक्‍ती रोज त्याच्याशी संबंधित गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होत चालले आहे.

मला सुशांतचा स्वभाव चांगला माहीत होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे, यावर मी विश्‍वास ठेवूच शकत नाही. ही आत्महत्या नसून, हत्याच आहे. जर समजा आपण हे मान्य केले की, सुशांतने आत्महत्या केली. तर कोणीही आत्महत्या केल्यावर त्याच्या गळ्यावर यू शेपचा आकार येतो; पण ज्यावेळी कोणी गळा दाबायचा प्रयत्न करते त्यावेळी गळ्यावर ओ शेपचा आकार दिसून येतो. सुशांतच्या गळ्यावरसुद्धा ओ शेप होता, असे अंकित म्हणाला. आत्महत्या केल्यावर डोळे आणि जीभ बाहेर येते;

पण सुशांतचे तसे अजिबात झाले नव्हते. त्यामुळे ही आत्महत्या नाही, हत्याच आहे. मी एक नक्‍की सांगू शकतो की, त्याच्या गळ्यावर खुणा सुशांतचा पाळीव श्‍वान फज याच्या बेल्टच्या होत्या. माझ्याकडे सुशांतचे मृत्यूनंतरचे काही फोटो आहेत. हे फोटो पाहिल्यावर मला सतत जाणवते की, सुशांतच्या गुन्हेगारांनी त्याचा फजच्या बेल्टने गळा आवळून खून केला आहे, असा दावाही त्याने केला आहे.

रियाजवळ सुशांतच्या फक्‍त दोन गोष्टी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप केल्यानंतर ‘ईडी’ने रियाची तब्बल आठ तास चौकशी केली. ‘ईडी’ने रियाच्या संपत्तीबाबत चौकशी केली. त्याचसोबत सुशांतची संपत्ती म्हणून माझ्याकडे फक्‍त दोनच गोष्टी आहेत, असा खुलासा रियाने केला. या दोन गोष्टी म्हणजे सुशांतने एका पानावर लिहिलेल्या काही ओळी आणि ‘छिछोरे’ असे नाव लिहिलेली त्याची पाण्याची बाटली.

सुशांतने एका वहीच्या पानावर काही लोकांचे आभार मानणारा मजकूर लिहिला आहे. त्यामध्ये रियासह तिचे आई-वडील तसेच भावाच्या नावाचा उल्लेख आहे. सुशांतने हे कधी लिहिले होते, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. सुशांतच्या या दोनच गोष्टी संपत्ती म्हणून माझ्याजवळ असल्याचे रियाने सांगितले.

सीबीआयची महिला अधिकारी करणार तपास

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे जाताच त्यांनी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला. सीबीआयचे एक विशेष पथक या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे. या पथकामध्ये मुझफ्फरपूरच्या आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांचाही समावेश आहे.

गगनदीप या 2004 च्या गुजरात कॅडरच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. गेल्या दीड वर्षापासून त्या सीबीआयमध्ये काम करत आहेत. अनेक मोठ्या आणि चर्चेत असलेल्या घोटाळ्यांसह हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपाससुद्धा गगनदीप यांनी केला आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली सुशांतच्या कुटुंबीयांची भेट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शनिवारी फरिदाबाद दौर्‍यादरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांची भेट घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत असल्याने त्यांना न्याय नक्‍की मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्‍त केला.
 

 "