होमपेज › Mumbai-Thane-Raigad › त्रिपुरा, बंगालमध्ये बलात्काराचा राजकीय वापर 

त्रिपुरा, बंगालमध्ये बलात्काराचा राजकीय वापर 

Published On: Mar 14 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 12:44AMमुंबई :  प्रतिनिधी 

त्रिपुरा व बंगाल या राज्यांमध्ये राजकीय पक्षांकडून बलात्काराचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जातो, असा धक्कादायक आरोप त्रिपुरामधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी केला. असे प्रकार देशात अन्यत्र कुठेही होत नाहीत केवळ बंगाल व त्रिपुरामध्ये होतात, असे ते म्हणाले. मुंबई प्रेस क्‍लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये ते बोलत होते. 

त्रिपुरामधील सर्वसामान्य नागरिक डाव्यांच्या राजवटीला कंटाळले होते. त्यांच्या कार्यकाळात तेथील जनतेचा कोणताही विकास झाला नाही. बेरोजगारांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे परिवर्तन करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे देवधर म्हणाले. त्रिपुरामध्ये पर्यटनक्षेत्रासाठी मोठी संधी असून पर्यटनाच्या माध्यमातून त्रिपुराचा विकास साधू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बांबू व्यवसाय, रबर कारखाने, फुड प्रोसेसिंग कंपन्यांच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या सहकार्याने त्रिपुराला विकासाच्या मार्गावर नेण्यात यश मिळेल असे ते म्हणाले. 

बुथ लेव्हलपर्यंत संघटन असलेल्या डाव्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने देखील बुथ लेव्हलपर्यंत जावून संघटन बांधले. त्रिपुरात डाव्यांविरोधात लढणार्‍या काँग्रेसची केंद्रात मात्र डाव्यांसोबत मैत्री असायची त्यामुळे नागरिकांना प्रभावी पर्याय दिसत नव्हता. भाजपने त्यांना प्रभावी पर्याय उपलब्ध करून दिल्याने मतदारांनी आम्हाला साथ दिली. त्रिपुरामध्ये 1000 राजकीय हत्या झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण मोठे असून शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते, आम्ही ही परिस्थिती बदलू व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू असे ते म्हणाले. 

त्रिपुरा विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य 

गल्लीबोळात  पुतळे उभारण्याला आपला विरोध आहे. मात्र पुतळे पाडण्याची कृती निषेधार्ह होती. शिवाजी महाराज हे राज्याच्या गौरवाचा विषय असल्याने त्यांचा पुतळा उभारायला काही हरकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्रिपुरामधील विजयामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही असा ठाम विश्‍वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे नैतिक बळ वाढल्याचे ते म्हणाले.