Sat, Mar 28, 2020 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भूमिपुत्रांची माय मराठीतच होते दांडी गुल्‍ल!

मराठी भूमिपुत्रांची माय मराठीतच होते दांडी गुल्‍ल!

Last Updated: Feb 27 2020 1:54AM
मुुंबई : पवन होन्याळकर

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण झगडत असताना माय मराठीत दरवर्षी  दहावी-बारावीला हजारो विद्यार्थ्यांची दांडी गुल्ल होत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मार्च 2019 मध्ये दहावीच्या परिक्षेस बसलेल्या 11 लाख 93 हजार 591 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 2 लाख 57 हजार 627 विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कमी होत असून मराठी नाममुद्रा आता लोप पावते की काय असे गेल्या पाच वर्षातील दहावी-बारावीतील भाषा विषयाच्या निकालावरुन स्पष्ट होत आहे. 

अंतर्गत मुल्यांकनातून भाषा विषयाला 20 पैकी मिळणार्‍या गुणबंदीचा मोठा फटका मराठी भाषा विषयांच्या विद्यार्थ्यांना बसला. मार्च 2018 मध्ये 1 लाख 14 हजार 957 विद्यार्थी नापास झाले. त्या विद्यार्थ्यांपेक्षा 2019 मध्ये अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. बारावी परीक्षेतही नापासांचे प्रमाण दहावीपेक्षा कमी असले तरी नापासांची संख्या 25 हजारांहून अधिक आहे. 

दहावीलाच अनेक विद्यार्थी नापास होतात, त्यामुळे बारावीला या विषयाची भीती असलेले फारसे पुढे येत नाहीत. त्यामुळे बारावीच्या मराठी भाषा निकालातील विद्यार्थी संख्या कमी दिसत आहे. इंग्रजी शाळाकडे पालकांचा ओढा असल्याने घराघरातच आता मराठीपण टिकवणारे वातावरण दिसत नाही असेही याचे एक कारण सांगितले जात आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या माय मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना हा विषय अवघड जात आहे. 

मराठी भाषा विषयाचा अभ्यास  खोलात जाऊन करण्याची आणि तो मनापासून समजून घ्यायची वृत्ती विद्यार्थी जोपासत नसल्याची तक्रार करून शिक्षक मोकळे होत आहेत.

बेस्ट फाईव्हचा फटका मराठीला

केंद्रीय बोर्डाच्या तुलनेत आपल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अधिक व्हावी या हेतूने आणलेल्या बेस्ट फाईव्ह या सूत्राचा फटका मराठी या विषयाला बसताना दिसत आहे. बेस्ट फाईव्ह विषयांची टक्केवारी घेवून एकूण टक्केवारी काढली जात असल्याने अनेक विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अभ्यास करत नाहीत. आपलीच बोली भाषा असल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासाकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे याचा प्रामुख्याने परिणाम भाषा विषयाच्या निकालावर होताना दिसत असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले.

...म्हणून अवघड जाते मराठी

अलिकडे मराठी भाषा पुस्तकांचे वाचन करताना फारसे विद्यार्थी दिसत नाहीत. या विषयाच्या अभ्यासाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मराठी व्याकरणाकडे दुर्लक्ष करतात. उत्तर लिहिताना ग्रामीण तसेच बोली भाषा वापरली जाते. त्यामुळे गुण कमी पडतात. शुद्धलेखनाच्या तर असंख्य चुका असतात. त्यामुळे मराठी मातृभाषा असूनही विद्यार्थी मागे पडतात. मराठी भाषा आपली मातृभाषा असली तरी बोलीभाषा ही वेगळी आहे. अनेक विद्यार्थी मराठीचा विषय हा बोली भाषेत लिहितात व प्रामुख्याने त्याचा फटका बोर्डाच्या परीक्षेत बसतोे. यामुळे अनेकजण नापास होतात असे मत मराठी विषयाच्या काही शिक्षकांनी व्यक्‍त केले.