Sun, Sep 27, 2020 02:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघर्ष भडकला : शिवसेना-भाजप आमनेसामने!

संघर्ष भडकला : शिवसेना-भाजप आमनेसामने!

Last Updated: Nov 09 2019 2:00AM
महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता संपुष्टात येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन गाठले आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिवसेनेवर तुफानी हल्‍ला चढवला. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सेनेला कोणताही शब्द दिलेला नव्हता याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रतिहल्‍ला चढवत सांगितले की, भाजप खोटे बोलत आहे आणि खोट्यांशी मला चर्चा करायची नाही.

उद्धव ठाकरे

सत्तावाटपाचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला. म्हणून आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. 
भाजप खोटे बोलत असेल तर त्यांच्याशी चर्चा नाही. चुकीच्या लोकांशी युती केली त्याबद्दल वाईट वाटते. शब्द फिरवणे ही भाजपची वृत्तीच आहे.
सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर मलाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला म्हणून चर्चेचे दरवाजे बंद केले. आम्ही खोट्यांशी बोलत नसतो. 
स्वत:चा खोटेपणा मान्य करत नाहीत तोपर्यंत भाजपशी चर्चा नाही.  
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव होता.  
महायुतीची भाषा करता, तर तुमच्या मित्रांना विचारा, 
त्यांना किती जागा मिळाल्या आणि किती जागा ते स्वत:च्या चिन्हावर लढले. 
काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही. खरे तर भाजपनेच माझी त्यांच्याशी ओळख करून द्यायला हवी. 
भाजपसह किंवा भाजपशिवायदेखील शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो. 


देवेंद्र फडणवीस

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा कोणताही शब्द दिला नव्हता. 
नवे सरकार हे भाजपच्याच नेतृत्वात येईल, सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार. मात्र सत्ता स्थापन करताना आमदार फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. 
मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक फोन केले. पण त्यांंनी एकही फोन घेतला नाही. 
निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले, ते आमच्यासाठी धक्कादायक होते. 
शिवसेनेने आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा केली. एकदा नव्हे, दिवसातून तीन तीनवेळा दोन्ही काँग्रेसशी चर्चा केली. 
उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांनी दरी वाढविली. 
केंद्र आणि राज्यात सत्तेत सोबत असूनही सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर केलेल्या टीकेमुळे दु:खी. 
युती अजूनही तुटलेली नाही. आमची खंत दूर झाली तर शिवसेनेशी चर्चा करू.

 "