Sat, Nov 28, 2020 15:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवी परीक्षा घेण्यास तीव्र विरोध

पदवी परीक्षा घेण्यास तीव्र विरोध

Last Updated: Jul 08 2020 1:16AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे आखत सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यूजीसीच्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त करत परीक्षाविरोधी धार कायम ठेवली. 

विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे.  अंतिम वर्षाच्या परीक्षा महत्त्वाच्या असतात, मग अनेक वर्षांपासून सहा सेमिस्टरचे मूल्यमापन करून निकाल का लावण्यात येत आहे. मुलांनी पाच सेमिस्टरपर्यंत परीक्षा दिल्या आहेत. त्याचे मूल्यमापन करून निकाल लावता येऊ शकतो, पण विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम यूजीसी करत असल्याचा आरोप छात्रभारती मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी केला.

या मार्गदर्शक तत्त्वांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि चिंता वाढेल. विद्यापीठांच्या पुढच्या वर्षाचे वेळापत्रक बिघडेल, आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि शिक्षक आणि महाविद्यालयावर अतिरिक्त भार पडेल, असे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) चे अध्यक्ष मुहम्मद सलमान यांनी सांगितले.

देशात दररोज कोरोना विषाणूबधितांचे विक्रमी रुग्ण वाढत असताना घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणारा आहे, असे म्हणत मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यूजीसीच्या परिपत्रकाच्या प्रती फाडत आंदोलन केले. युवासेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. सात दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास विद्यार्थी उपोषणाला बसतील, असा इशारा विद्यार्थी भारतीच्या मंजिरी धुरी यांनी दिला.

यूजीसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे धक्कादायक : सामंत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील कोविडची परिस्थिती सर्वांना माहीत असताना हा निर्णय म्हणजे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे. राज्यातील परिस्थिती आपण परत केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

यूजीसीने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात सामंत यांनी अशा प्रकारे ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्या राज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य नाही.