Thu, Jan 28, 2021 08:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसआरएच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी ‘स्ट्रेस फंड’

एसआरएच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी ‘स्ट्रेस फंड’

Last Updated: Jul 10 2020 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील विविध मालकीच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने कंबर कसली आहे. बरेचसे प्रकल्प काही वादविवाद किंवा आर्थिक तंगीमुळे रखडलेले असून ते वेळेवर पूर्ण करण्याचा प्राधिकरणाने निर्धार केला असून त्यासाठी राज्य सरकारकडून सातशे ते एक हजार कोटीचा स्ट्रेस फंड उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या स्ट्रेस फंडाचा फायदा मुंबईतील सुमारे 370 प्रकल्पांना होणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळताच पालिका प्रशासन व यंत्रणांचे धाबे दणाणले. कोरोना नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. तेव्हा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धारावी पुनर्विकासासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. भविष्यात साथीचे रोग किंवा कोरोनासारख्या रोगांना रोखण्यासाठी शहरे झोपडपट्टीमुक्त झाली पाहिजेत, असे आव्हाड यांनी सांगितले.

मुंबई शहरातील झोपडपट्टीधारकांना 300 चौरस फुटाचे घर एसआरएच्या माध्यमातून देण्यास शासन तयार आहे. झोपडपट्टी धारकांनी एकत्रित येऊन बहुमताने पुनर्विकासासंबंधी ठराव पास  करून विकासक व एसआरए च्या माध्यमातून पुनर्विकासाची योजना राबवण्याचे निश्चित होते. मात्र सोसायट्यांमधील आपापसातील वाद, विविध शासकीय परवानग्या, आर्थिक चणचण अशा कारणांमुळे एसआरए प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत असतो. 

सध्याच्या स्थितीत मुंबईत एसआरए चे सुमारे 370 प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले आहेत. वाद-विवाद टाळत हे सर्व रखडलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून सुमारे सातशे ते एक हजार कोटीचा स्ट्रेस फंड देण्यात येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. शिवाय अजूनही ही पैशाची गरज भासल्यास सरकारी बँकांकडून निधी पुरवठा केला जाईल असेही आव्हाड यांनी सांगितले.