Sat, Sep 19, 2020 09:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्यावर राज्य शासनाचे मौन 

कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्यावर राज्य शासनाचे मौन 

Last Updated: Aug 12 2020 12:36AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोकणात गणपती करिता विशेष रेल्वे गाड्या सोडण्यावरून राज्य शासनाने मौन बाळगले आहे. चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी रेल्वेला विशेष गाड्या चालवा अशी विनंती राज्य सरकारने केली. तशी तयारी रेल्वेने केली. त्यानुसार 11 ऑगस्ट पासून 194 गाड्या चालविन्याचे रेल्वेने नियोजन केले. परंतु राज्य सरकारने ऐनवेळी तात्पुरती स्थगिती देण्याची सूचना सोमवारी रेल्वेला केली. यावर राज्य सरकारकडून मंगळवारीही कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आली नाही. त्यामुळे संभ्रम वाढला असून कोकण वासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोकणात जाणार्‍यांसाठी 14 दिवस विलगीकरण बंधनकारक करण्यात आल्याने त्याप्रमाणे अनेकांनी दोन आठवड्यापूर्वीपासून आपले गाव गाठन्याकरिता खासगी बसगाड्यांसाठी अव्वाच्यासव्वा रक्कम दिली. त्यानंतर 4 ऑगस्टला कोकणासाठी एसटी सोडण्याची घोषणा राज्य सरकारने केली. रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय होत नसल्याने अनेकांनी एसटीचे आरक्षण केले. गणेशोत्सवाचे आगमन आणि विलगीकरणाचा कालावधी पाहता रेल्वेगाड्या सोडण्याची परवानगी राज्य सरकारने दहा दिवस आधीच देण्याऐवजी ती 7 ऑगस्टला दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वेला 9 ऑगस्टला रेल्वे बोर्डाकडून विशेष गाड्या सोडण्याची परवानगी मिळाली. मात्र 10 ऑगस्टला राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला गाड्या सोडण्यास तात्पुरती स्थगिती द्या आणि प्रतिक्षा करा असे  सांगितले. 

मंगळवारी रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून याविषयी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. त्यामुळे गाड्या सोडण्याचा संभ्रम वाढला. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी, आम्ही गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. राज्य सरकारच्या पुढील सूचनेची प्रतिक्षा करत असल्याचे सांगितले. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जड्यार यांनी विशेष रेल्वेगाड्या या दहा दिवस आधीच सोडल्या असत्या तर त्याचा अधिक फायदा झाला असता असे सांगितले.


 

 "