Mon, Sep 21, 2020 19:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजपासून सायन उड्डाणपूल बंद

आजपासून सायन उड्डाणपूल बंद

Last Updated: Feb 14 2020 2:09AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगराला जोडणारा दुवा म्हणून ओळखला जाणारा सायन उड्डाणपूल शुक्रवारी, 14 फेब्रुवारीपासून दुरूस्तीच्या कामानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, गर्दीच्या वेळी दोन्ही दिशेने वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे प्रत्येक आठवड्यातील पहिले चार दिवस काम बंद ठेवण्यात येणार असल्याने मुंबईकरांच्या कोंडीतील भर काही प्रमाणात कमी होणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकांची कमीत कमी गैरसोय व्हावी याची काळजी घेण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीला नियोजनासाठी 30 वॉर्डन देण्यात आले आहेत. कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट प्रशासनाने समोर ठेवले आहे.

दरम्यान मुंबईत लाखो वाहने पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबई व दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरात सायन उड्डाणपुलामार्गे ये-जा करत असतात. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामाचा त्रास या सर्वच वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे.

पूर्व उपनगरातून मुंबई शहरात प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा सायन उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम 52 दिवस चालणार असून प्रत्येक आठवड्यातील चार दिवस पूल कामानिमित्त बंद असेल. तसेच वाहतुकीमध्ये जास्त बाधा येऊ नये, म्हणून ब्लॉक पद्धतीने पुलाचे काम केले जाईल.

अशी असेल पुलाच्या कामाची पद्धत गुरुवारी रात्री 10.00 ते सोमवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत (चार दिवस) दर आठवड्यात सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सोमवारी सकाळी उड्डाणपूल पूर्ववत वाहतुकीसाठी  सज्ज राहील. त्यामुळे, वाहनचालकांची गैरसोय होणार नाही. एप्रिलअखेर काम पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आल्याचे महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

वाहतुकीच्या मार्गात केलेले बदल

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने उत्तरेकडून दक्षिण मुंबईत महेश्वरी सर्कलपर्यंत आल्यानंतर अवजड वाहनांना अरोरा जंक्शन येथून उजवे वळण घ्यावे लागेल. उजवे वळण घेतल्यानंतर वाहने चार रस्तामार्गे वडाळा उड्डाणपुलाच्या सिग्नलपर्यंत जातील. येथील सिग्नलवर उजवे वळण घेऊन मुंबई जिल्हा एड्स सोसायटीशेजारील वडाळा वळण रस्ता घेऊन पुलावरून पुढे जातील. याठिकाणी वाहनांना डावे वळण घेऊन बरकत अली नाका गाठावा लागेल. त्यानंतर नाक्यावरून उजवे वळण घेऊन बरकत अली दर्गा मार्गाने शिवडी-चेंबूर लिंक रोड मार्गे डावे वळण घेऊन ईस्टर्न फ्रीवे खालील मार्गाने भक्ती पार्क वडाळा आणिक डेपो मार्गावर येऊन अहुजा ब्रिजमार्गे पूर्व द्रुतगती महामार्गाने ठाणे किंवा नवी मुंबईच्या दिशेने जाता येईल.

कधी बंद असेल सायन पूल?

 14 फेब्रुवारी रात्री 10 ते 17 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत
 20 फेब्रुवारी रात्री 10 ते 24 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत
 27 फेब्रुवारी रात्री 10 ते 2 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत
 5 मार्च रात्री 10 ते 9 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत
 12 मार्च रात्री 10 ते 16 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत
 19 मार्च रात्री 10 ते 23 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत
 26 मार्च रात्री 10 ते 30 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत
 2 एप्रिल रात्री 10 ते 6 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत

 "