Sat, Nov 28, 2020 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वीजबिल ईएमआयवर ग्राहकांना 14% व्याजदराचा शॉक

वीजबिल ईएमआयवर ग्राहकांना 14% व्याजदराचा शॉक

Last Updated: Jul 11 2020 1:20AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉक डाऊन काळात वाढीव वीजबिल आकारणार्‍या वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना ईएमआयवर बिल भरण्याचा तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र या ईएमआयवर 14 टक्के व्याजदर आकारण्याचा निर्णय देत पुन्हा एकदा वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना दुसरा झटका दिला आहे. परिणामी, आधीच वाढीव वीजबिल भरणार्‍या ग्राहकांच्या माथ्यावर व्याजाचा बोझा वाढणार आहे.

मुंबई महानगरातील 50 लाख ग्राहकांना वीज पुरवठा कऱणार्‍या बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर कंपन्यांनी जानेवारी ते मार्च या महिन्यांतील ग्राहकांच्या वीज वापराच्या युनिटनुसार एप्रिल व मे महिन्यात सरासरी बिल आकारले आहे. मात्र ही सरासरी काही भागांमध्ये अधिक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. परिणामी, तीन महिन्यांत ईएमआयवर बील भरण्याचा पर्याय वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना सुचवला. मात्र या ईएमआय पद्धतीमध्ये ग्राहकांना 14 टक्के व्याजदर आकारण्याचा झटका वीज वितरण कंपन्यांनी दिला आहे. 

परिणामी, ग्राहकांना पुन्हा एकदा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. याउलट महावितरणने राज्यातील 2 कोटी 40 लाख ग्राहकांना ईएमआयची सुविधा उपलब्ध करून देताना कोणतेही व्याज आकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जून महिन्यात वाढीव वीजबिल आल्याची ग्राहकांमधून ओरड झाल्यानंतर सरकारने तीन हफ्त्यांमध्ये वीजबिल भरण्याचा निर्णयही रद्द केल्याची माहिती आहे.

दरम्यान, 10 लाख मुंबईकरांना वीज पुरवठा करणार्‍या बेस्ट प्रशासनाने ग्राहकांकडून 12 ते 14 टक्के व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट उपनगरात वीज पुरवठा करणार्‍या टाटा पॉवरने अद्याप ईएमआयवर आकारण्यात येणार्‍या व्याजदराबाबतची माहिती स्पष्ट केलेली नाही. अदानी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने ईएमआयवर 9.9 टक्के व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर गुरूवारी व्याज रद्द करण्याचे कंपनीने ठरवले. त्याऐवजी तीन महिन्यांची मुदत देण्याचे कंपनीने ठरवले.

वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले की, मुंबईबाहेर वीज पुरवठा करणार्‍या महावितरणकडून वीजबिलांवरील व्याज रद्द केल्यानंतर मुंबईकरांकडून व्याज आकारणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने मुंबईकरांना थोडी तरी सवलत द्यायला हवी, असे पेंडसे यांनी सांगितले. 

वाढीव बिलांना सेलिब्रिटींचा विरोध

सर्वसामान्य ग्राहकांसह बॉलिवूडमधील अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता अर्शद वारसी या सेलिब्रिटींनी वाढीव वीजबिलास कडाडून विरोध केला आहे. अदानी कंपनीने तब्बल दसपट वीजबिल पाठवल्याचा दावा अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर केला आहे.