प्रशासनातील नाराजीची किंमत मुख्यमंत्र्यांना मोजावी लागेल

Last Updated: Jul 05 2020 1:25AM
Responsive image


मुंबई : उदय तानपाठक

कुणालाही कल्पना न देता परस्पर लॉकडाऊन वाढवण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते संतापले आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. कोणत्याही जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी तेथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याखेरीज करू नये, अशी सूचनाही पवार यांनी शुक्रवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईत दोन किलोमीटरच्या  बाहेर जाण्यावर घालण्यात आलेल्या बंदीबद्दलही पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सरकारने ही बंदी उठवली. राज्याचे निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार म्हणून नेमणूक करण्यावरून मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचेही पवार यांनी ठाकरे यांच्या कानावर घातले. यापैकी काही अधिकार्‍यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

अजोय मेहता यांनी दिलेले आदेश वा सूचना आम्ही स्वीकारणार नाही, अशी भूमिका या अधिकार्‍यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. एका वरिष्ठ सनदी अधिकार्‍याने तर मेहता यांच्या सूचना पाळाव्या लागणार असतील, तर राजीनामा देण्याची धमकीच दिली आहे. प्रशासनात अशा प्रकारचा असंतोष असणे राज्यकारभार करताना परवडणारे नाही. अजोय मेहतांना प्रशासनात लक्ष घालण्याची मुभा दिल्यास त्याची मोठी किंमत सरकारला आणि व्यक्तिश: मुख्यमंत्र्यांना मोजावी लागू शकते, असेही शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावल्याचे समजते. प्रशासनातील नाराजीचा फायदा विरोधी पक्षाला होईल आणि त्याचा सरकारला मोठा फटका बसेल, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.