Thu, Nov 26, 2020 20:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने; अनेक ठिकाणी संभ्रम कायम

राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने; अनेक ठिकाणी संभ्रम कायम

Last Updated: Nov 22 2020 2:40AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिने बंद ठेवण्यात आलेल्या शाळा सोमवार, 23 नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. या निर्णयानुसार 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा मात्र 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. कोकणात मात्र संभ्रम कायम आहे. 

शाळा सुरू करण्याच्या या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेक जिल्ह्यांतील शिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. असे असताना शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर तर दुसरीकडे 23 तारखेपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्याचे पूर्वीचे आदेश असल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या कोविड आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान, शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केल्याने संभ्रम वाढला आहे. स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी  पालक मात्र पाल्याला शाळेत पाठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. जिथे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत तिथे तसेच ठेवावेत, अशी मागणी पालकांतून व्यक्त होत आहे.

शिक्षक आणि कर्मचारी कोरोनाबाधित 

शाळा सुरू होण्याआधी शिक्षक, कर्मचार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने पावले उचलली आहेत. या चाचणीदरम्यान अनेकजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उस्मानाबादमधील 48 शिक्षक, नांदेडमध्ये एकाच शाळेतील अकरा शिक्षक, तर औरंगाबादमध्ये पंधरा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीड जिल्ह्यातील 25 शिक्षकही बाधित आढळले आहेत. अन्य जिल्ह्यातही कमीअधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षणही सुरूच राहणार आहे. कोरोना संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्याचवेळी शाळा सुरु करताना स्थानिक जिल्हाधिकार्‍यांनी सर्वांशी विचारविनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा असेल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.