Thu, Aug 13, 2020 17:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय झा काँग्रेसमधून निलंबित; प्रिया दत्त यांचा घरचा आहेर

संजय झा काँग्रेसमधून निलंबित; प्रिया दत्त यांचा घरचा आहेर

Last Updated: Jul 16 2020 1:16AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी काँग्रेस नेते संजय झा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निलंबित केले. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविल्यानंतर झा यांनी त्यांचे समर्थन करताना पक्षावर टीका केली. राजस्थानच्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एका चर्चेत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. दरम्यान, मागील महिन्यात काँग्रेसविरोधात एक लेख लिहिल्याने त्यांना प्रवक्ता पदावरून हटविण्यात आले होते.

संजय झा यांच्याकडे 2013 पासून काँग्रेस प्रवक्ता पदाची जबाबदारी होती. अनेक चर्चासत्रांमध्ये ते काँग्रेस पक्षाची बाजू मांडत असत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

प्रिया दत्त यांचे ट्विट

माजी खासदार प्रिया दत्त यांनी पायलट प्रकरणावरून काँग्रेसला घरचा आहेर दिला. दत्त यांनी ट्विट करून म्हटले की, माझ्या आणखी एका मित्राने पक्ष सोडला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण नेते आहेत.  दोघांनीही कठीण काळात पक्षासाठी मेहनत घेतली. आमच्या पक्षाने हे दोन्ही नेते गमावले आहेत. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही.