Thu, May 28, 2020 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मातोश्री'नंतर संभाजी भिडे 'वर्षा'वर दाखल

'मातोश्री'नंतर संभाजी भिडे 'वर्षा'वर दाखल

Last Updated: Nov 08 2019 2:38PM

संग्रहित फोटोमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री पद हे सत्तासंघर्षातील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा दोन ते तीन दिवसांत निघाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपमध्ये तडजोड व्हावी यासाठी  शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे मध्यस्थी करत आहेत. ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने त्यांची भेट झाली नाही. भिडे हे कोणतीही पूर्वसूचना न देता मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने संभाजी भिडे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले.  

राज्यातील निवडणुका झाल्या, निकाल लागला. १०५ जागा जिंकत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. मात्र, अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यात सत्ता युतीचीची येणार असा गाजावाजा सुरू असतानाच मुख्यमंत्री भाजपचाच होणार तर लोकसभा निवडणुकीवेळी जे ठरलं, त्याप्रमाणे सत्तेत वाटा द्या म्हणत सेना आपल्या मागणीवर ठाम आहे. यामुळे सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. राज्यात युतीचे सरकार यावे म्हणून मध्यस्थीसाठी काल मातोश्रीवर आणि त्यानंतर भिडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आज वर्षा बंगल्यावर दाखल झाले. 

यावेळी भिडे यांना उद्धव ठाकरे यांनी भेट घेण्यास नकारल्याची चर्चा सुरू होती. तर शिवसेनेकडून, उद्धव ठाकरे मातोश्रीवर नसल्याने भेट झाली नाही, त्यामुळे भेट नाकारली असे म्हणणे चुकीचे आहे असे सांगण्यात आले आहे. याच भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा दावा केला आहे की, संघ आणि भाजपकडून सत्तास्थापनेसंदर्भात प्रस्ताव घेऊन संभाजी भिडे हे मातोश्रीवर गेले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली.

राज्यात सत्ता येणार की राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती निर्माण झाली असून राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची चर्चा करताना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्री पद प्रत्येकी अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. या चर्चेनुसारच सत्तेचे वाटप व्हावे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. तसेच आपल्याला भाजपसोबतची युती तोडायची नाही, फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेचे वाटप व्हावे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.