Sat, Sep 19, 2020 08:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोशल मीडियावर निर्बंध!

सोशल मीडियावर निर्बंध!

Last Updated: May 29 2020 1:05AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या मध्यामातून मेसेज, व्हिडीओ आणि ऑडियोद्वारे आक्षेपार्ह पोस्ट, चूकीची माहिती, खोटी माहिती, अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याने मुंबई पोलिसांनी यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. कायद्याच्या कलम 144 अन्वये एका नोटिसीद्वारे 25 मे ते 8 जूनपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फायदा उठवत समाजकंटक व्हाट्सअँप, फेसबुक, ट्वीटर, टिक टॉक, यूट्यूब यासह अन्य सोशल मीडियाच्या मध्यामातून आक्षेपार्ह पोस्ट, अफवा आणि खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरवत आहेत. त्यामुळे मुख्यत्वे करून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

सोशल मीडियावर घडणार्‍या या सर्व आक्षेपार्ह गोष्टीना आळा घालण्यासाठी राज्याच्या सायबर पोलीस विभागाने कंबर कसली असून सोशल मीडियावर सतत नजर ठेवून कारवाई सुरु ठेवली    आहे. तर, अशा समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिल्याने पोलिसांनीही सीआरपीसी कायद्याच्या कलम 149 अन्वये संबंधितांना नोटिसा धाडण्यासही सुरुवात केली आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून राज्याचा सायबर विभाग कारवाई करत असतानाच मुंबई पोलिसांनीही अशा समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, व्हिडीओ, ऑडियो पोस्ट केल्यास संबंधीतांवर कायद्याच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. एका नोटिसीद्वारे 25 मे ते 8 जूनपर्यंत हे आदेश पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी जारी केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरील समुहांच्या (ग्रुप) प्रमुखांना आणि समुह सदस्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. समुहामध्ये आक्षेपार्ह गोष्टी घडल्यास समुहाच्या प्रमुखाला यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर भादंवी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले जात असल्याने समूह प्रमुखांनी योग्यती खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

मुख्यतः आक्षेपार्ह टिकटॉक व्हिडिओ बनवून पोस्ट करणे, शेअर करणे, भडकावू मेसेज किंवा पोस्ट टाकणे, कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणार्‍या पोस्ट्स टाकणे, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देणे, कोरोनाग्रस्तांची नावे जाहीर करणे, विविध राजकीय नेत्यांच्या बदनामी करणार्‍या पोस्ट्स, फोटो टाकणे किंवा त्यांच्यावर हीन दर्जाच्या टीका करणे, नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणे असे गुन्हे शोशल मीडियाच्या मध्यामातून केले जात आहेत.

दरम्यान, सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे टाळा, जर कोणी अशा पोस्ट्स टाकत असेल तर त्यांना परावृत्त करा. कोरोनाबाबत चुकीच्या माहितीचे बळी न पडता येणारी माहिती स्वतः तपासून बघा. सरकारी यंत्रणेशी खात्री करून नंतरच माहिती फॉरवर्ड करा. व्हाट्सअँप ग्रुपवर अँडमिन असल्यास किंवा ग्रुप बनवला असेल तर आपल्या ग्रुपवर अशा प्रकारची आक्षेपार्ह आणि चूकीची माहिती, पोस्ट येणार नाहीत याची काळजी घ्या. सायबर गुन्हे रोखण्यास सहकार्य करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 "