अन्य सणांप्रमाणेच बकरी ईदवरही निर्बंध

Last Updated: Jul 15 2020 1:35AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या चार महिन्यांत आपण सर्वधर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतीकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्यावर सर्वांचे एकमत झाले. 

बकरी ईदसंदर्भात मंगळवारी आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनीदेखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी, असे आवाहन यावेळी केले. काँग्रेसच्या नेत्यांकडून बकरी ईदसाठी लॉकडाऊनमधून सूट देण्याची मागणी होत होती. मात्र, या बैठकीत बकरी ईदवरही अन्य सणांप्रमाणे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईदनिमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडईचा आग्रह नको, असे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्येदेखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचारदेखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

कुर्बानीचे विधी ऑनलाईन? 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की,  गेल्या चार महिन्यांत जे सण उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईदनिमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावी. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेन्मेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी.