Tue, Aug 04, 2020 13:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे जिल्ह्यात विक्रमी २०२७ नवे कोरोना रुग्ण

ठाणे जिल्ह्यात विक्रमी २०२७ नवे कोरोना रुग्ण

Last Updated: Jul 04 2020 1:05AM

संग्रहित छायाचित्रमुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

रुग्णवाढीचा नवा उच्चांक प्रस्थापित करीत कोरोनाने ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 2027 नवे रुग्ण नोंदवले. आतापर्यंतची ही उच्चांकी संख्या होय. मुंबईतही शुक्रवारी 1372 नवे रुग्ण नोंदवले गेले तर राज्यातही कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला. तब्बल  6364 नवे रुग्ण दाखल झाले.

मुंबईत शुक्रवारी कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 1372ने वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 81 हजार 634 वर पोहोचला आहे. 73 जणांचा मृत्यू झाला असून 1698 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 73 रुग्णांपैकी 58 जणांचा मृत्यू दीर्घकालीन आजाराने झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 759 वर पोहचली आहे.

राज्यात एका दिवसात कोरोनाच्या विक्रमी 6364 नवीन रुग्णांचे निदान झाले असून एकूण रूग्ण संख्या आता 1 लाख 92 हजार झाली आहे. त्यापैकी सध्या 79 हजार 911 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

ठाणे जिल्ह्यात चोवीस तासांत 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने बळींची संख्या 1176 वर पोहचली आहे. नवी मुंबईला मागे टाकणार्‍या कल्याणात पुन्हा 564 आणि ठाण्यातील 420 नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांची जिल्ह्यातील संख्या 38 हजार 594 वर गेली आहे. सुमारे दहा हजार रुग्ण सापडलेल्या ठाणे महापालिका हद्दीत 17 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

झोपडपटट्टया, दाटवस्तींप्रमाणे गृहसंकुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की नऊ दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यात सुमारे 14 हजार  27 नवे रुग्ण सापडले तर तब्बल 327 रुग्ण दगावले. ठाण्यातील एकूण रुग्ण संख्या 9 हजार 950 वर पोहचली आहे. सर्वात जास्त रुग्ण आता हे नौपाडा-कोपरी , वागळे, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदररोड परिसरात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51 टक्के आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये विक्रमी 276 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3 हजार 885 झाली आहे. आणखी तीन जण दगावल्याने मृतांचा आकडा 152 झाला आहे. उल्हासनगरात पुन्हा विक्रमी 191 रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या दोन हजार 347  झाली आहे. सुदैवाने दोघांचा  मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 49 झाला आहे.  भिवंडीत 62 नव्या रुग्ण आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 118 तर रुग्ण संख्या 2 हजार 173 वर गेली आहे.  

ठाणे ग्रामीण भागात 108 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने शहापूर,  मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथमधील ग्रामीण भागात अधिक कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 907  पोहचली आहे. चार रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 54 झाली आहे.

अंबरनाथ शहरात 101 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. दुदैवाने पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 57 झाली असून कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार 32 वर गेला आहे. शेजारील कुळगांव-बदलापूरात 48 नव्या रुग्णांची भर पडल्याने रूग्णांची संख्या 906 झाली असून आतापर्यंत 15 रुग्ण दगावले आहेत. 

दरम्यान, राज्यात 5 लाख 89 हजार  448 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 42 हजार 371 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. शुक्रवारी आणखी 3515 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 1 लाख 4 हजार 687 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.24 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील 48 तासात झालेल्या 150 मृत्यूपैकी मुंबई मनपा-73, ठाणे-2, ठाणे मनपा-9, कल्याण-डोंबिवली मनपा-5, उल्हासनगर मनपा-1, भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर मनपा-1, वसई-विरार मनपा-5, मालेगाव मनपा-1, धुळे मनपा-2, जळगाव-3, जळगाव मनपा-2, नंदूरबार-1, पुणे-2, पुणे मनपा-16,सोलापूर मनपा-5, औरंगाबाद-2, औरंगाबाद मनपा-4, जालना-5, लातूर-1, अकोला-2, अकोला मनपा-1, अमरावती-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत. तर 48 मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत

 शहर                                       रुग्ण      मृत       
ठाणे                                        9950    369             
नवी मुंबई                                7345    232       
कल्याण-डोंबिवली                     8049    130       
मीरा-भाईंदर                            3885    152          
भिवंडी                                    2173    118       
अंबरनाथ                                2032      57       
उल्हासनगर                            2347      49                 
ठाणे ग्रामीण                           1907      54                  
बदलापूर                                  906       15           
 एकूण                               38,594    1176