Wed, May 12, 2021 02:18
सर्रास ‘सीटी स्कॅन’ कॅन्सरला निमंत्रण

Last Updated: May 04 2021 2:42AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णांनी सर्रास सीटी स्कॅन करणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण देण्यासारखे आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी हा इशारा सोमवारी झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत दिला.

डॉ. गुलेरिया म्हणाले, देशभर सीटी स्कॅनचा गैरवापर सुरू असल्याचे लक्षात आले आहे. तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणे असतील तर सीटी स्कॅन करण्याचा कोणताही फायदा नाही. उलट त्यातून दुष्परिणामच संभवतात. कारण एक सीटी स्कॅन करणे हे छातीचा तब्बल तीनशे वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे. या किरणांचा आरोग्यावर घातक परिणाम होतो.

कोरोनाची लक्षण दिसू लागताच ही लक्षणे सौम्य आहेत की तीव्र आहेत याचा विचार न करता हे रुग्ण सीटी स्कॅन केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. गेल्या एक महिन्यात या रांगा सगळीकडेच वाढलेल्या दिसतात. साधारणत: घरच्या घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णाची प्रकृती खालावली किंवा रुग्णालयातील रुग्णाची प्रकृती खालावली तर सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली गेली आणि आठवडाभराच्या उपचारांनीही ती सुधारली नाही तर संसर्गाची पातळी तपासण्यासाठी सीटी स्कॅन केले जाते. कोरोनाचा रुग्ण घरी विलगीकरणात अअसेल तर त्याने दिवसातून पाच ते सहा वेळा ऑक्सिजन पातळी तपासली पाहिजे. ही पातळी 96 पेक्षा अधिक असेल तर काळजीचे कारण नसते. मात्र, ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असणारे रुग्णही सीटी स्कॅन करतात किंवा त्यांना तसा सल्ला दिला जातो. यातून रुग्णांची आर्थिक लूट होतेच मात्र अशा रुग्णांना कॅन्सरच्या दाढेत ढकलण्याचाही उद्योग सुरू आहे.

सीटी स्कॅन म्हणजे काय?

सीटी स्कॅन करताना विविध प्रकारची क्ष किरणे तथा एक्स-रेज एकत्रित वापरली जातात. त्याद्वारे संपूर्ण शरीराचे किंवा शरीराच्या विशिष्ट भागाचे चित्र काढले जाते. सर्वसाधारण एक्स-रे पेक्षा सीटी स्कॅनचे चित्र शरीरातील स्थितीचे तपशिल अधिक देते. अत्यंत गंभीर स्थितीत किंवा अत्याधिक वैद्यकीय गरज असेल तरच सीटी स्कॅन करतात. कारण एक सीटी स्कॅन म्हणजे एकाच वेळी तीनशे वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे.