Thu, Aug 06, 2020 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणीबाग पर्यटकांसाठी खुली होणार

राणीबाग पर्यटकांसाठी खुली होणार

Last Updated: Jul 16 2020 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहरातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय ( राणीबाग) पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

मुंबईसह देशविदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी राणीबागेला भेट देतात. वाघ, हत्ती, पाणघोड्यासह शेकडो प्राणी, पक्षी आणि सुमारे साडेतीन हजारांहून अधिक दुर्मिळ वनसंपदा हे राणीबागचे आकर्षण आहे. राणीबागेत मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणण्यात आले. त्यामुळे दररोज पाच हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटक येत आहेत. त्यामुळे उत्पन्नात एक लाखांपासून सहा लाखांपर्यंत वाढले आहे. कोरोना लॉकडाउनमुळे मार्च महिन्यापासून राणीबाग बंद आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत उद्यान सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राणीबाग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. मुंबईला लॉकडाऊन काळात घालण्यात आलेले काही निर्बंध उठवण्यात आले आहेत. 

या पार्श्वभूमीवर भायखळा येथील राणीबाग पुन्हा खुली करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दररोज 50 टक्के पर्यटक प्रवेश, सामाजिक वावराचे पालन आणि आवश्यक खबरदारीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला असून सरकारने परवानगी दिल्यानंतर राणीबाग पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहे. पर्यटक व  प्राण्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी प्रेक्षक गॅलरीपासून एक मीटर अंतर ठेवले जाईल. तिकीट खिडकीजवळही सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. दर दोन तासांनी सॅनिटायझेशन करण्यात येईल, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.