Wed, Aug 12, 2020 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरोपीचे आडनाव चुकीचे लिहून चौकशीचे नाटक!

आरोपीचे आडनाव चुकीचे लिहून चौकशीचे नाटक!

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:49AMमुंबई : अवधूत खराडे

पंजाब नॅशनल बँकेच्या गोरेगाव शाखेतून करण्यात आलेल्या एफडी टू ओडी घोटाळ्यातील तब्बल 4 कोटी 14 लाख एका साखर कारखान्याच्या संचालिका आणि सांगली जिल्ह्यातून आमदारकीची अपक्ष निवडणूक लढविलेल्या वर्षा माडगुळकर यांच्या खात्यात जमा झाल्याची धक्कादायक माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. डीडीच्या माध्यमातून ही रक्कम माडगुळकरांच्या खात्यात जमा करण्यात आली असतानाही तपास करताना नावातील काही अक्षरे जाणूनबुजून गहाळ करत पोलीस त्यांना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यावसायिक सुरेश मित्तल (62) यांनी त्यांच्या आयुर्वेद प्रचार संस्थेच्या नावाने पीएनबी बँकेत काढलेल्या 5 कोटींच्या एफडी टू ओडी घोटाळ्यासह तब्बल 19 प्रकरणांमध्ये आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. यातील मित्तल यांना गंडा घालून लंपास करण्यात आलेल्या करोडो रुपयांतील काही रकमेसह अशाप्रकारच्या अन्य घोटाळ्यातील असे एकूण 4 कोटी 14 लाख 65 हजार 427 रुपये डीडीच्या माध्यमातून माडगुळकर यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील  खात्यात जमा झाल्याचे तपासात उघड झाले. या संदर्भात पुरावे गोळा करुन आरोपींच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ यांनी 26 फेब्रुवारी 2015 रोजी अ‍ॅक्सीस बँकेला एक पत्र लिहीले.

धनलक्ष्मी बँकेतून माडगुळकरांच्या खात्यात पाठविण्यात आलेल्या रकमेचा डीडी क्रमांक 288502 याचा उल्लेखसुद्धा मिसाळ यांनी केला. मात्र माडगुळकरांच्या बँक खात्यात जमा झालेल्या रकमेच्या व्यवहाराबाबत विचारणा करताना, त्यांच्या नावातील *ग* हे अक्षर वगळून माडुळकर असा नावाचा उल्लेख पत्रात केला. त्यामुळे बँकेनेही माडुळकर नावाच्या व्यक्तीचे आपल्याकडे खाते नसल्याचे उत्तर पोलिसांना पाठविले. हे लेखी उत्तर पोलिसांनी तपास अहवालात जोडून माडगुळकरांविरोधातील कारवाई बंद केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माडगुळकर या जिजामाता साखर कारखान्याच्या संचालिका असून त्यांनी सांगली जिल्ह्यातून अपक्ष म्हणून आमदारकीच्या निवडणूक लढविली होती.

माडगुळकरांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या करोडो रुपयांप्रमाणेच या घोटाळ्याबाबत अनेक गोष्टी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आल्या. महत्वाचे म्हणजे घोटाळ्यासाठी मोठ्याप्रमाणात वापरण्यात आलेल्या ज्योती एंटरप्रायझेसचे बँक खाते धनलक्ष्मी बँकेत उघडण्यात आले होते. त्यावेळी धनलक्ष्मी बँकेच्या गोरेगाव शाखेच्या व्यवस्थापक अमृता मॅथ्यूज होत्या. त्यांना अशाप्रकारच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ज्योती एन्टरप्रायझेसमधून ओडीसाठी धनादेश घेऊन येत असलेल्या विमल बारोट याची सर्व कामे मॅथ्यूज यांच्याच सांगण्यावरुन करावी लागत होती असा जबाब बँकेतील कर्मचार्‍यांनी पोलिसांकडे नोंदविला आहे.

चार वर्षे तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हेशाखेन याप्रकरणात मुख्य घोटाळेबाज मोहम्मद फसिउद्दीन आणि चेक आणून देण्याचे काम करणार्‍या विमल बारोट यांनाच अटक केली आहे. मोहम्मद फसिउद्दीन याने मोठ्याप्रमाणात घोटाळ्यातील रक्कम बांधकाम व्यवसायात गुंतविल्याचे उघड झाले. फसिउद्दीन याने अटकेनंतर 1 कोटी रुपये भरतो असे सांगून किल्ला कोर्टाकडून या गुन्ह्यात जामीन मिळविला आहे. 

मात्र ही 1 कोटीची अट शिथील करण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गेल्या महिन्यात न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्याची माहिती मिळते. मूळचे जयपूरमधील रहिवाशी असलेले आयुष बियानी आणि पवन बियानी हे दोन ठग गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्या प्रेम क्रिशी प्रा. लि. आणि पी. जी. फॉईल्सच्या खात्यात घोटाळ्यातील रक्कम जमा झाल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. 

ज्या पीएनबी बँकेच्या गोरेगाव शाखेत घोटाळा झाला त्या शाखेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक विजयसिंह सिरोहा, वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कालरा आणि उप व्यवस्थापक एस. एस. मातेकर यानाही अद्याप अटक करण्यात आली नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

असा केला घोटाळा... 

1) आमिष दाखवुन गुंतवणूक आणायची...

करोडो रुपये बँकेमध्ये पडून असलेल्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांना, मालकांना गाठायचे. करोडो रुपयांच्या फिक्स डिपॉझीटसाठी त्यांना एखाद्या बँकेमध्ये गुंतवणूक करण्यास गळ घालायची. यासाठी बँकेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना हाताशी धरुन नेहमीपेक्षा काही टक्के जास्त व्याज या ग्राहकासाठी मिळवून घ्यायचे. बँक एफडीवर जास्त व्याज देत असल्याने ही व्यक्ती ठगांच्या आमिषाला बळी पडते. एफडीसाठी गुंतवणूक निश्‍चीत झाल्यानंतर या व्यक्तीकडून एक लेखी पत्र घेऊन हे ठग त्याची एक रंगीत झेरॉक्स काढून ती आपल्याकडे ठेवत होते.

2) बँकेच्या अधिकार्‍यांशी हातमिळवणी..

ग्राहकाने एफडीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या एफडीची खरी पावती आपल्याच हातात येईल अशी सेटींग या आरोपींनी आधीच बँकेत केलेली असे. बँकेकडून ही खरी एफडी पावती हातात पडताच आरोपी ठग त्याची हुबेहूब दिसणारी पावती तयार करुन या ग्राहकाला देत होते. एफडी एका वर्षापासून अधिक काळासाठी असल्याने हा ग्राहक निश्‍चींत होऊन ती एफडी पावती आपल्या लॉकरमध्ये ठेवतो. याचाच फायदा उचलत आरोपी ग्राहकाच्या नावाने ओडीसाठी एक विनंती पत्र बनवत त्यावर त्याची खोटी सही करुन खरी एफडी पावती जोडत होते.

3) रक्कम काढण्यासाठी डिसकाऊंटर खात्यांचा वापर..

आधीच बँक अधिकार्‍यांशी सेटींग असल्याने या खर्‍या एफडी आणि बनावट विनंती पत्राच्या आधारे आरोपीं पाहीजे असलेल्या बँक खात्यात रक्कम वळती करुन ती लपांस केली. यासाठी आरोपींनी मोठ्याप्रमाणात मार्केटमध्ये सहज उपलब्ध असलेल्या कमिशनवर रोख रक्कम काढून देण्यार्‍या काही व्यक्तींच्या (डिसकाऊंटर) खात्याचा वापर केला आहे. एफडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत असून एफडी टू ओडी घोटाळ्याची आणखी प्रकरणे उघडकीस येत असल्याचे एका तपास अधिकार्‍याने सांगितले.