Sun, Aug 09, 2020 02:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वेश्याव्यवसायः लॉज चालकाला अटक

वेश्याव्यवसायः लॉज चालकाला अटक

Published On: Jul 21 2019 1:25AM | Last Updated: Jul 21 2019 1:25AM
उल्हासनगर : प्रतिनिधी

बांगलादेशी महिलांना लॉजमध्ये डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या लॉज चालकाला मध्यवर्ती पोलिसांनी तब्बल 8 महिन्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मध्यवर्ती पोलिसांनी व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा ठाणे शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून कॅम्प 3 येथील शांतीनगर परिसरात असणार्‍या नित्या रेसिडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डींगमध्ये छापा टाकला. त्यावेळी त्या लॉजमध्ये मॅनेजर, वेटर व लॉजचालक रत्नाकर शेट्टी यांनी तीन बळीत घुसखोर बांग्लादेशी महिलांना लॉजमध्ये डांबून ठेवले होते. त्यांना पैशाचे आमिष दाखवून लॉजमध्ये येणार्‍या ग्राहकांसोबत त्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यावेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तीन बांग्लादेशी महिलांसह लॉज मॅनेजर सोमनाथ व वेटर शिवदयाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. पण त्या गुन्ह्यातील लॉजचालक रत्नाकर शेट्टी गेल्या 8 महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता. 

शुक्रवारी दुपारी रत्नाकर हा नित्या लॉजमध्ये आला असल्याची माहिती पोलीस हवालदार विजय बनसोडे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय बनसोडे, पोलीस नाईक मोरे, पारधी यांनी नित्या लॉजमध्ये जावून रत्नाकर शेट्टी याला ताब्यात घेऊन अटक केली.