मुंबईतील खासगी दवाखाने बंद; रुग्णांचे हाल

Last Updated: Mar 27 2020 1:28AM
Responsive image


मुंबई: तन्मय शिंदे

ओपीडी बंद न ठेवण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले असूनही काही वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली खासगी ओपीडी बंद ठेवली आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेही, नाक कान घशाचे आजार असलेल्या रुग्णांसोबत गरोदर स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याच्या दुष्परिणाम पाहून अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्या आहेत. गर्दी होत असल्याने ओपीडी बंद ठेवण्यात येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र ओपीडी बंद असल्याने थेट बड्या रुग्णालयांचा आधार घेण्याची वेळ ओढवली आहे. 

सोमय्या रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन बोटे यांनी पुढारीला सांगितले की, अनेक खासगी ओपीडी बंद असल्याने हृदयरोग असलेल्या रुग्ण ज्या ठिकाणी ओपीडी सुरू असेल तेथे गर्दी करत आहेत. मंगळवारी 32 वर्षाच्या तरुणाची एन्जोप्लास्टी केली. त्यामुळे सध्या कमी वयोगटातही हा आजार दिसून येतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या ओपीडी बंद असल्यामुळे अनेक डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. मात्र अनेक डॉक्टरांनी इमर्जन्सी सेवा सुरू ठेवल्या आहेत. तसेच जुने पेशंटही प्रत्येकाशी संपर्क करतात. त्यामुळे इमर्जन्सी असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा तुमच्या डॉक्टरांशी सध्यातरी मोबाईल वा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात राहा, असा सल्‍लाही त्यांनी दिला. 

तर प्रसूतीच्या तपासण्यांना विलंब 

सध्या वाडिया रुग्णालयात प्रायव्हेट आणि स्पेशल ओपीडीच्या ऐवजी आम्ही जनरल ओपीडी सुरू केली आहे. मात्र जर खासगी ओपीडी डॉक्टर बंद ठेवत असतील तर प्रसूतीसाठीच्या तपासण्याना विलंब होऊ शकतो, अशी भीती वाडिया रुग्णालयाचे डॉ. निरंजन गायकवाड यांनी व्यक्‍त केली. मात्र पहिल्या तपासणीनंतर सात दिवस मग 14 त्यानंतर 21 दिवसानंतर बोलावण्यात येते. तसेच प्रसूतीची तारीख जवळ आलेल्या महिलांना ओपीडी बंद असल्याने काही जास्त फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले. 

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मधुमेह व रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवा असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब तसेच मधुमेही रुग्णांना दोन ते तीन दिवसांनी तपासणीसाठी बोलावले जाते. त्यांचीही ओपीडी बंदमुळे अडचण झाली आहे.