Thu, Jul 09, 2020 07:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान’

‘राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान’

Last Updated: Nov 12 2019 7:30PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सत्ता स्थापनेची कोंडी न फुटल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान असल्याचे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९८० साली शरद पवार यांचा पुलोद सरकारचा प्रयत्न फसल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ साली नवे सरकार स्थापन होण्यापूर्वीही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर यावेळी भाजपा शिवसेना महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाच्या आग्रहासाठी शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्यामुळे राज्याला राष्ट्रपती शासनाला सामोरे जावे लागले.

सत्‍ता स्थापनेचा गुंता अधिक जटील झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करताच केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आणि सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर मोहोर उमटवली. दरम्यान राष्ट्रपती राजवटीला कडाडून विरोध करीत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेतली जावी, अशी विनंती शिवसेनेने न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता धूसर असल्याचे सूत्रांनी सांगितले.