नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांकडून निलंबित सहायक पाोलिस निरीक्षक सचिन वाझेंचं समर्थन केलं जातं आहे, वाझे आणि शिवसेना यांचं नातं काय आहे, असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. महाराष्ट्रातील सरकार हे महाविकास आघाडीचे नव्हे ना महावसुली आघाडीचे आहे. मागील ३० दिवसांत राज्यातील घडामोडींचं रेकॉर्ड ठेवणं अवघड झालं आहे. पोलिसचं बॉम्ब ठेवतात, हे मुंबईत पहिल्यांदा दिसलं, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात रोज नवे राजकीय खुलासे होतात. वाझे म्हणजे लादेन नव्हे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत वाझेंचं 1समर्थन का केलं जातं. वाझे काहीतरी खुलासे करतील म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले गेले. वाझेच्या पत्रात अनेक नेत्यांवर गंभीर आरोप आहेत.
महाराष्ट्रात वाझेंच्या माध्यमातून लूट सुरू करण्याचं काम सुरू होतं. वाझे खरे बोलतात की काय, अशी त्यांना भीती असावी. महाराष्ट्रात अशी गद्दारी यापूर्वी कधीचं पाहायला मिळाली नव्हती. शिवसेनेने सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. आता उद्धव ठाकरे गप्प का आहेत?, असा सवाल करत त्यांनी परबांवर आरोप झाल्यानंतर सेनेची प्रतिक्रिया बदलली, असा आरोप केला.
महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरं निघाली. तेथे भ्रष्टाचाराचा कळस झालाय. असे म्हणत असताना जावडेकरांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीला जनतेने निवडून दिलं नव्हतं. महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाली. सरकार मोदींचा फोटो लावून निवडून आले, नंतर गद्दारी केली. असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
महाराष्ट्रात ५ लाख डोस वाया
महाराष्ट्रात फक्त ५ ते ६ दिवसांचा लसीचा साठा शिल्लक आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात लसी पुरवणे ही राज्याची जबाबदारी आहे. नियोजन नसल्यामुळे महाराष्ट्रात ५ लाख डोस वाया घालवले. 'उलटा चोर कोतवाल को डाटे' अशी महाराष्ट्र सरकारची अवस्था आहे, अशी टीकाही त्यांनी केली.