कशिशमध्ये अश्लील नृत्य, पोलिसांची एन्ट्री आणि ३५ बारबाला ताब्यात

Last Updated: Jan 14 2021 1:00PM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील नृत्य सुरू असलेल्या लेडीज सर्व्हिस बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक धाड टाकली. तेथील कशिश नामक बारमध्ये तब्बल ३५ बारबाला अश्लील व विभत्स हावभाव करताना आढळून आल्या. पोलिसांनी या बारबालांना ताब्यात घेऊन बारमध्ये अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारच्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराजे साळवे, डीबी पथकाचे पोलिस निरीक्षक भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने कल्याण-मलंग रोडला असलेल्या नांदिवली गावाच्या हद्दीतील कशिश बारवर अचानक धाड टाकली. यावेळी एका हिंदी गाण्यावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत ग्राहकांसमोर बारबालांचा नाच सुरु होता. या छापेमारीत पोलिसांनी ३५ बारबालांसह इतरांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सदर ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ ४ गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल ३५ बारबाला चालकाने ठेवल्या होत्या. शिवाय बारबाला आकर्षक व तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करत होत्या. 

कशिश बारमध्ये चालक - मालक, कर्मचारी व ग्राहकांकडून त्या बारबालांना अश्लील नृत्य करण्यास संगनमताने प्रोत्साहित केल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने कल्याण-डोंबिवलीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास बारबालांना नाचवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.