Thu, Aug 06, 2020 03:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रे रोड स्टेशनवरील पूल बंद!

रे रोड स्टेशनवरील पूल बंद!

Published On: Sep 12 2019 1:51AM | Last Updated: Sep 12 2019 1:51AM
मुंबई : प्रतिनिधी 

भरधाव ट्रकने लोखंडी पिलरलाच धडक दिल्याने हार्बर मार्गावरील रे रोड स्टेशनजवळचा पूल बुधवारी सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, गुरुवारची विसर्जन मिरवणूकही अडचणीत येऊ घातली आहे. 

रे रोडचा हा पूल 70 ते 80 वर्षे जुना असून पुलाचा अर्धा भाग रेल्वेच्या तर अर्धा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. बुधवारी पहाटे एका ट्रकच्या धडकेने पिलरचा काही भाग वाकला. आणखी दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. माझगाव, डॉकयार्ड रोड, भायखळा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माझगाव, भायखळ्यापासून सीएसटी परिसरात जाण्यासाठी सुमारे एक ते दीड तासाचा वेळ लागत होता. रात्रीपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती.

या पुलाची दुरूस्ती करण्याचा निर्णय पालिकेने काही महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यात आता पिलरचे नुकसान झाल्याने पालिकेने तातडीने स्ट्रक्चरल अ‍ॅडिटरकडून पुलाची तपासणी करून घेतली. ऑडिटरचा अहवाल बुधवारी रात्री येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच  पुढील कार्यवाही केली जाईल. मात्र तोपर्यंत पूल बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.