Wed, Aug 12, 2020 04:06



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

Last Updated: Feb 25 2020 1:44AM

संग्रहित छायाचित्र



मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यातील १९ जिल्ह्यांतील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका २९ मार्च २०२० रोजी होणार आहेत. तर त्याची मतमोजणी ३० मार्च २०२० होणार आहे. त्यानुसार निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १८ मार्च पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. 

तर मतदान २९ मार्च २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी करण्यात येणार आहे. 

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: 
ठाणे- १३, रायगड- १, रत्नागिरी- ८, नाशिक- १०२, जळगाव- २, अहमनगर- २, नंदुरबार- ३८, पुणे- ६, सातारा- २, कोल्हापूर- ४, औरंगाबाद- ७, नांदेड- १००, अमरावती- ५२६, अकोला- १, यवतमाळ- ४६१, बुलडाणा- १, नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली- २९६  एकूण- १५७०