Tue, Jun 15, 2021 13:13
शरद पवारांना काँग्रेसपेक्षा शिवसेना का जवळची वाटते?

Last Updated: Jun 11 2021 2:50AM

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन करत असताना शरद पवार यांच्या राजकारणाविषयीचे आजपर्यंतचे गैरसमज धुवून काढणाऱ्या काही बाबी केल्या. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तीकेंद्रित राजकारण, राष्ट्रवादी फोडून भाजपने घडवून आणलेले पक्षप्रवेश आदी बाबीमुळे दुखावलेले शरद पवार भाजपला जवळ करणार नाहीत अशी स्थिती आहे. शिवाय भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष असल्याने तेथे नव्या पिढीत स्पेस तयार करण्यासाठी पवारांची मानसिकता नाही, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. 

अजित पवार यांनी रातोरात भाजपशी हातमिळवणी केली तेव्हा अनेकांनी हे पवारांनीच घडवून आणले असे सांगत कुजबूज केली. पण दुसरीकडे संजय राऊत बुहमताचा आकडा सांगत होते. अखेर पवारांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले. एकूण घडामोडी पाहता पवार हेच महाविकास आघाडीचा कणा आहेत, हे सर्वजण मान्य करतात. शिवसेना आणि भाजपमध्ये जो अघोषित करार झाला त्यानुसार समान पदांचे वाटप या महत्त्वाच्या मुद्द्यावरून सेनेने काडीमोड घेतला. हा घेत असताना राष्ट्रवादीने वचन दिल्याने सेनेने हे धाडस केले. शिवसेनेने भाजपशी संबंध तोडले तेव्हा काँग्रेसच्या कमिट्यांच्या जोरबैठका सुरू होत्या. काँग्रेसच्या निर्णयाची पद्धत माहीत असल्याने पवारांनी या सर्व पातळ्यांवर आपली ताकद आणि राजकीय चातुर्य पणाला लावले. त्यातून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार येत असताना उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शिवसेनेतील अन्य पर्यायांचा विचार करण्यात आला मात्र, उद्धव ठाकरे असतील तरच हे सरकार चालेल अन्यथा ते ते कोसळेल असे ठाकरे यांना समजावल्यानेच कुठलेही पद न स्वीकारणारे ठाकरे मुख्यमंत्री झाले. एकूण या सरकारला आकार देण्याचे महत्त्वाचे काम शरद पवार यांनी दिले, त्यामुळे त्याच्या संचलनाची जबाबदारी पवारांची आहे. याच भावनेतून आजवर मतभेदांमध्ये, कोंडीमध्ये पवारांनी संकटमोचकाची भूमिका पार पाडली आहे. सरकारमध्ये अजित पवार दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असले तरीही एकूण महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू आपल्याभोवती कसा राहील याची पुरेपूर काळजी पवारांनी घेतली आहे. 

पवारांच्या शिवसेनेच्या जवळीकीबाबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात, ‘पवारांचे सध्याचे राजकारण अजिबात संभ्रमाचे नाही. त्यांच्याबद्दल आधीच्या राजकरणाबद्दल अनेक वदंता आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांवर कठोर टीका केली आहे. हे स्वत: भाजपकडे गेले तर त्यांची विश्वासार्हता धुळीस मिळेल. त्यांचा एकूण पवित्रा पाहता सावध दिसतो. त्यांना अगदीच ममता बॅनर्जी यांच्यासारखे वागायचे नाही. तसेच वागले तर त्यांच्या ताब्यातील एजन्सीजचा वापर करून भाजप फारच त्रास देऊ शकते. तो त्रास सहन करण्याची त्यांना सवय नाही. पवारांचे आजवरचे राजकारण पाहता ते सत्तेच्या जवळ राहण्याचे आहे. त्यामुळे केंद्राशी ते फारसा पंगा घेतील असे दिसत नाही. पण काही गोष्टी अधोरेखित करता येतील अशा आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकांवेळी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला. मध्यंतरी संजय राऊत यांच्याकरवी युपीए अध्यक्षपदाबाबत त्यांनी आपले नाव पुढे आणले हे पाहता सध्याच्या राजकीय पटलावर मोदीविरोधक ही प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मोदी पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय राजकारणात राहतील याची शाश्वती नाही. ७५ वर्षांनंतर मी राजकारणात राहणार नाही, असे मोदी यांनी जाहीर केले होते. २०२४ साली ते ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील. त्यामुळे पुढील काळात राजकारण करण्याची संधी पवारांना आहे. मात्र, वय हा मोठा फॅक्टरही आहे. 


काँग्रेस हा न लढणारा पक्ष

सध्या काँग्रेस हा पक्ष भुईसपाट झाला आहे. काँग्रेसची स्पेस व्यापून टाकायला आता राष्ट्रवादीने सुरुवात केली आहे. पुढील निवडणुकीत १०० जागा मिळवायच्या हे आमचे ध्येय आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीला ७०-७२ जागांच्या वर राष्ट्रवादी गेलेली नाही. काँग्रेस सध्या तरी लढताना दिसत नाही. काँग्रेस लढली नाही आणि वाढली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राजकारण करेल. मोदी यांच्याविरोधात कोण असा लोकांना प्रश्न पडला तर काय असा जो काही शेलका प्रश्न विचारला जातो त्याला उत्तर देण्याची ही शिस्तबद्ध चालही असू शकते. 

शिवसेनेचे कठोर टीकाकार

मुंबई दंगलीनंतर शिवसेनेच्या टिकेला धार आली. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रमुख लक्ष्य राहिले ते शरद पवार. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत या टिकेच्या जोरावर राज्यात युतीचे सरकार आले. याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार  शरद कारखानीस म्हणतात, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध कितीही चांगले असल्याचे बोलले जात असले तरी ते एकमेकांचे कठोर टीकाकार होते. शरद पवार यांनी बाळासाहेबांवर प्रचंड टीका केली. तर ठाकरे यांनीही त्याच माध्यमातून सत्तेपर्यंत पक्ष नेला. असे असले तरी केवळ भाजपला विरोध म्हणून पवार आणि शिवसेनेची जवळीक नाही. तर एकूण भविष्यकालीन राजकारणाची नांदी असू शकते.