Sun, Aug 09, 2020 02:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुर्ल्यात नागाच्या दंशाने पोलीस शिपायाचा मृत्यू

कुर्ल्यात नागाच्या दंशाने पोलीस शिपायाचा मृत्यू

Last Updated: Dec 10 2019 12:49AM
कुर्ला/धारावी : वार्ताहर 

कुर्ला येथील नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या पोलीस वसाहतीत राहणारा पोलीस शिपाई सुनील तुकाराम भगत (35) याला नाग चावून त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सुनील हा पुणे पोलिसात कार्यरत होता, तर त्याची पत्नी समृद्धी भगत या देवनार पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांना श्लोक नावाचा दोन वर्षांचा मुलगा आहे. 

सुनील आणि समृद्धी हे नेहरू नगर येथील पोलीस वसाहतीत इमारत क्र.  110 मध्ये 3684 या घरात राहतात. रविवारी रात्री सुनील आणि त्याची पत्नी झोपलेली असताना रात्री साडे तीनच्या सुमारास सुनीलला अस्वस्थ वाटू लागले. पायाला असहय्य वेदना होऊ लागल्या. छातीत दुखू लागले त्यामुळे त्याने पत्नीला उठवले आणि पाणी आणण्यास सांगितले. त्याची पत्नी किचनमध्ये जात असताना तिला एक नाग दिसला. 

त्याच वेळी सुनीलची तब्येत पूर्णपणे खालावली. शेजार्‍यांच्या मदतीने समृद्धीने सुनीलला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारास दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक डी. पाटील अधिक तपास करत आहेत.

नागाबाबत कळताच पोलिसांनी सर्पमित्र सुनील कदम यांना त्याची माहिती दिली. कदम यांनी घटनास्थळी जाऊन साडेतीन फूट लांबीच्या विषारी नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. सुनीलचा मृत्यू हा सर्प दंशानेच झाल्याचा अंदाज नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी वर्तविला आहे. या घटनेमुळे पोलीस वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.