Sat, Nov 28, 2020 19:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोनामुळे पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू 

मुंबईत कोरोनामुळे पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू 

Last Updated: Jul 04 2020 12:45AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे आणखी एका पोलीस अधिकार्‍याचा शुक्रवारी मृत्यू झाला. भागिनाथ जगन्नाथ आढाव (52) हे समतानगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूने मुंबई पोलीस दलातील कोरोना शहीद पोलिसांची संख्या 39 झाली आहे. 

लष्करातून पोलीस सेवेत दाखल झालेले भागिनाथ हे गुन्हे शाखेचे कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचे मोठे बंधू होत. कांदिवली येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलीस वसाहतीत  भागिनाथ आढाव पत्नीसह दोन मुलांसोबत राहत होते. त्यांचा एक मुलगाही लष्करात आहे तर दुसरा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. आढाव यांनी 19 वर्षे लष्कराची सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर 2009 साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले होते. 26 जूनला प्रकृती बिघडल्याने त्यांना कांदिवलीच्या चारकोप येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर तेथीलच कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. 

राज्यात 65 पोलीस शहीद

शुक्रवारी आणखी तीन पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना युद्धात शहीद झालेल्या पोलिसांची संख्या 65 वर पोहचली आहे. शहीद पोलिसांमध्ये राज्य पोलीस दलातील चार अधिकारी आणि 61 अंमलदारांचा समावेश आहे.115 पोलीस अधिकारी आणि 910 अंमलदार अशा एकूण 1 हजार 25 कोरोनाग्रस्त पोलिसांवर मुंबईसह राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.