Tue, Jun 15, 2021 13:06
पाचवी पास आता दहावी पास होणार!

Last Updated: Jun 11 2021 2:18AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

यंदाच्या वर्षी खासगी विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल पाचवी, सहावी, सातवी अथवा आठवी ज्या कोणत्या वर्षी पास होऊन शाळा सोडली असेल, त्या वर्षाच्या निकालावरून दहावीसाठी गुण दिले जाणार आहेत. 17 नंबरचा फॉर्म भरून बाहेरून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांचा निकाल असा लावला जाणार आहे.

दहावीला जे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. त्यांना आता ज्या इयत्तेपासून शाळा त्यांनी सोडली, त्या इयत्तेच्या मागील इयत्तेच्या निकालाची टक्केवारी गृहीत धरून 80 टक्के गुण दिले जाणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने पाचवी किंवा अन्य इयत्तेपासून शाळा सोडली असेल आणि तो यंदाच्या वर्षी 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसला असेल, तर त्याला पाचवीच्या इयत्तेचा निकाल सादर करावा लागेल. त्या वर्षाच्या निकालाचे मूल्यमापन करून 80 टक्के गुण दिले जातील, त्यानंतर उर्वरित 20 टक्के गुण तोंडी परीक्षा घेऊन दिले जाणार आहेत. याचा अर्थ असा होतो कि, यंदाच्या वर्षी खासगी विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल पाचवी ते आठवी ज्या कोणत्या वर्षी पास होऊन शाळा सोडली असेल, त्या वर्षाच्या निकालावरून दहावीसाठी गुण दिले जाणार आहेत. तसा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या मूल्यमापनाच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.