Sun, Jul 05, 2020 04:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पानिपत’चा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा

‘पानिपत’चा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा

Last Updated: Dec 04 2019 12:40AM
मुंबई : प्रतिनिधी   

कॉपीराईटसचा आरोप करण्यात आल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पानिपत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपल्या कादंबरीतील घटना आणि तपशील परवानगी न घेताच वापरण्यात आल्याचा आरोप करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी अशी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांनी  केलेली विनंती न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते यांनी मंगळवारी फेटाळून लावली.  ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना कोणीही त्यावर आपला हक्क गाजवणे चुकीचे आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी विश्वास पाटील यांचा आक्षेप मोडीत काढला.

पानिपत या आपल्या कांदबरीवरूनच चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचा आरोप विश्वास पाटील यांनी केला होता. पाटील यांच्यावतीने युक्तिवाद करताना पानिपत या कादंबरीसाठी आठ वर्षे संशोधन केले आणि त्यानंतर पानिपतची निर्मिती झाली, यावरून रणांगण हे नाटकही आले होते. त्या नाटकाचे सुमारे 400 प्रयोग झाले असून हे नाटकही खूप गाजले. आजवर केवळ आपणच मराठ्यांच्या या लढ्याला एक गौरवशाली लढा म्हणून ओळख मिळवून दिली, असा दावा करण्यात आला.

तसेच सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवली गेलेली दृश्ये आणि घटना या आपण लिहिलेल्या कादंबरीतील कथेशी साधर्म्य साधतात. त्यामुळे आपली परवानगी न घेता बनवलेला हा सिनेमा आपल्याला एकदा दाखवावा किंवा प्रदर्शनाआधी त्याची स्क्रिप्ट आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी विश्वास पाटील यांनी केली. मात्र हायकोर्टाकडे ती फेटाळून लावली.