Thu, Jan 21, 2021 00:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा उद्रेक

कोरोनाचा उद्रेक

Last Updated: Jul 05 2020 1:45AM
मुंबई/ठाणे/नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

शनिवार जणू कोरोना विषाणूचा विक्रमाचा दिवस असावा. एकाच वेळी देशात आणि महाराष्ट्रात सर्वोच्च संख्येचे कोरोना रुग्ण नोंदवले गेले. शनिवारी एकाच दिवसात देशात 22 हजार 771 नवे रुग्ण समोर आले. तर महाराष्ट्रातही तब्बल 7 हजार 74 नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढ स्थिरावत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील शहरांमध्ये कोरोनाने मोठे आव्हान उभे केले आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवारी 1948 नवे रुग्ण समोर आले. ठाणे शहरातील रुग्णसंख्या 10358 वर पोहोचली असून, जिल्ह्यातील रुग्णही 40 हजार 542 वर गेले आहेत. मुंबईतही शनिवारी 1180 नव्या रुग्णांची नोंद होत एकूण संख्या 82 हजार 814 वर पोहोचली तर 68 जणांचा मृत्यू झाला. 

कोरोनाचा ठाणे जिल्ह्यात सामाजिक संसर्ग झाल्याने मुंबईपेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होत आहे. माजी महापौर, चार नगरसेवक, पोलिसांसह 1 हजार 48 नवे रुग्ण शनिवारी सापडले असून एका पोलीस नाईकासह 45 जणांनी जीव गमावला आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 40 हजार 542 वर गेली असून मृतांचा आकडा 1 हजार 221 झाला आहे. एकट्या ठाणे शहरात रुग्णांचा आकडा 10 हजार 358 वर पोहचला असून 386 रुग्ण दगावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ठाण्याला मागे टाकेल एवढ्या वेगाने कल्याणमध्ये रुग्ण सापडत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेत अचानक येऊन कोरोनाचा आढावा घेतला. 

महाराष्ट्रातील एकूण रुग्ण संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात अनलॉक जाहीर झाल्यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत होत असून, 8 हजार 671 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढू लागताच मुंबईच्या काही भागांसह ठाणे, नवी मुंबई आदी शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागला आहे. मुंबईत आतापर्यंत 83 हजार 227 तर ठाणे जिल्ह्यात 45 हजार 833 रुग्ण सापडले आहेत. पुण्यात 26 हजार 956 रुग्ण झाले आहेत. राज्यतील अन्य शहरातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात शनिवारी 295 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 124 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 171 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.33 टक्के एवढा आहे. राज्यात 5 लाख 96 हजार  38 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 41 हजार 566 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ठाण्यातील माजी महिला महापौरांसह ठाणे महापालिका क्षेत्रात 408 नवे रुग्ण सापडले असून दुदैवाने पुन्हा 17 रुग्ण दगावल्याने मृतांचा आकडा 386 वर पोहचला आहे. ठाण्यातील एकूण रुग्ण संख्या दहा हजार 358 वर पोहचली आहे. चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सतीश देसाई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या पोलीस ठाण्यात आणखी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाने नौपाडा-कोपरीत थैमान घालण्यास सुरूवात केली असून  पुन्हा नवे 86 रुग्ण सापडले आहेत. घोडबंदर परिसरात 63, वर्तकनगर 61,  लोकमान्यनगर 37, उथळसर 49, कळवा 64, दिवा 17  आणि मुंब्र्यात फक्त 6 रुग्ण सापडले आहेत. पाच हजार 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51 टक्के आहे. 

नवी मुंबईला मागे टाकणार्‍या कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोनाचा कहर अधिकच वाढत असून आणखी 555 रुग्ण सापडले आहेत. गुरूवारी 560, शुक्रवारी 564 रुग्णांची नोंद झालेली आहे. रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 604  वर पोहचली आहे. पाच रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 135 वर पोहचली आहे. नवी मुंबईत 257 नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्ण संख्या सात हजार 602 झाली आहे.  आणखी 7 रुग्ण दगावल्याने मृतांचा आकडा 239 झाला आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये विक्रमी 126 रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार हजार 11 झाला आहे. सहा रुग्णांचे कोरोनाने बळी घेतल्याने महापालिका क्षेत्रात मृतांचा आकडा 158 झाला आहे. उल्हासनगरात पुन्हा विक्रमी 212 रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या दोन हजार 559  झाली आहे.  तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 52 वर पोहचला आहे.  भिवंडीत 77 नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 119 तर रुग्ण संख्या 2 हजार 250 वर गेली आहे.  ठाणे ग्रामीण भागात विक्रमी 173 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शहापूर,  मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथमधील ग्रामीण भागात हे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. आता कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 80 झाली असून नवे चार रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 58  झाली आहे.

अंबरनाथ शहरात 94 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. एक रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 58 झाली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन हजार 126 झाली आहे. शेजारील कुळगांव-बदलापूरात 46 नव्या रुग्णांची भर पडल्याने रूग्णांची संख्या 952 झाली असून आतापर्यंत 16 रुग्ण दगावले आहेत.