Sat, Jul 11, 2020 10:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोनाचा कहर : ठाणे जिल्ह्यात 1484, मुंबईत 903 तर राज्यात 4878 नवे रुग्ण

कोरोनाचा कहर : ठाणे जिल्ह्यात 1484, मुंबईत 903 तर राज्यात 4878 नवे रुग्ण

Last Updated: Jul 01 2020 2:07AM
मुंबई / ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 1484 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 44 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये 2 जुलैपासून कडक लॉकडाऊन जारी करण्याचे आदेश महापालिकेने मंगळवारी जारी केले. मुंबईतही कोरोना रुग्णवाढीत किंचित घट झाली आणि मंगळवारी 903 नवे रुग्ण नोंदवले गेले. राज्यात मंगळवारी आणखी 4878 निदान झाले असून सध्या राज्यात 75 हजार 979 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 77,197 वर पोहोचली आहे. मुंबईत मंगळवारी 93 जणांचा मृत्यू झाला असून 625 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 36 जणांचे मृत्यू 48 तासात आहेत. तर 57 रुग्णांचे मृत्यू 29 जूनपूर्वी झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या मुंबईतील रुग्णांची संख्या 4 हजार 554 वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 33 हजार 324 रुग्ण झाले असून मृतांची संख्या 1064 वर गेली आहे. गेल्या सहा दिवसांत ठाणे जिल्ह्यात 8 हजार 660 नव्या रुग्णांची भर पडली असून 222 रुग्ण दगावले आहेत.

सोमवारी विक्रमी 1 हजार 561 रुग्णानंतर आज पुन्हा एक हजार 484 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी कल्याण-डोंबिवली महापालिकेत 462 रुग्ण सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत एकूण रुग्णसंख्या सहा हजार 575 तर मृतांचा आकडा 120 झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 266 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ठाण्यातील एकूण रुग्णसंख्या 8 हजार 772 वर पोहोचली आहे. दुर्दैवाने पुन्हा 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ठाणे शहरातील मृतांचा आकडा 326 वर गेला आहे. 

भिवंडीत 82 नवे रुग्ण व 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 109 तर रुग्णसंख्या 1 हजार 941 वर गेली आहे.  मीरा-भाईंदरमध्ये 161 नव्या रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्ण दगावले आहेत. अंबरनाथ शहरात 54 रुग्ण सापडले आहेत. तीन रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 45 वर पोहोचली आहे. उल्हासनगरात विक्रमी 148 रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या 1 हजार 914  झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात 101 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 594  पोहोचली आहे. कुळगाव-बदलापुरात 32 रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 774 झाली आहे. 358 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

1951 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची  संख्या 90 हजार 911 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.2 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात मंगळवारी 245 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासांमधील, तर उर्वरित 150 मृत्यू मागील कालावधीतील आहेत.