मुंबई : पुढारी ऑनलाईन
धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. हा झोपडपट्टी परिसर सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, आता येथील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जिनिव्हामध्ये एका पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी धारावी मॉडेलचे कौतुक केले. त्यांनी भारताचा उल्लेख करत मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेली धारावी येथील कोरोना परिस्थिती कशी नियंत्रणात आली, याबद्दल सांगितले.
यानंतर आता राजकारण सुरु झाले आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरएसएस आणि इतर संस्थांनी धारावी कोरोनामुक्त होण्यासाठी कोणताही आवाज न करता रात्रंदिवस काम केलं आहे. त्यामुळे सगळं श्रेय राज्य सरकारला देणं हा त्यांच्यावरील अन्याय आहे. WHO ने तेथील तेथील माहिती घेतली पाहिजे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.