मुंबईत दडवलेले ६०० कोरोना बळी जाहीर करा

Last Updated: Jul 14 2020 1:59AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेने रुग्णालयांबाहेर झालेले कोरोनाचे 600 बळी अजूनही जाहीर केलेले नाहीत. ही आकडेवारी पडताळणी करून तात्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. कोरोना चाचण्या आणि सुविधा वाढवा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रुग्णालय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा-भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी दौरा केल्यानंतर फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हे चौदा पानांचे तपशीलवार पत्र लिहिले आहे.

10 जुलैपर्यंत महाराष्ट्रात 12 लाख 53 हजार 978 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 2 लाख 31 हजार 468 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. प्रारंभीपासून संसर्गाचा दर पाहिला, तर तो आता 19 टक्क्यांवर गेला आहे आणि अलीकडे दररोजच्या चाचण्या आणि रुग्णसंख्या पाहिली, तर तो जवळजवळ 25 टक्के झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा वाटा 30 टक्के, तर मृत्यू संख्येत महाराष्ट्राचा वाटा 44.62 टक्के इतका भीषण आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

कोरोनाच्या चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. प्रतिदहा लाख लोकसंख्येचा विचार करून ही क्रमवारी निश्चित झालेली आहे. राज्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या अधिक आहे, हे गृहितकच मुळात चुकीचे आहे, राज्य सरकारने पूर्ण क्षमता वापरून चाचण्या केल्या नाहीत आणि वाढत्या रुग्णसंख्येच्या द़ृष्टीने  सुविधा निर्माण केल्या नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा देण्यासही विरोधी पक्षनेते विसरलेले नाहीत.