Sat, Oct 31, 2020 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात केवळ ७ लाख ८३ हजार स​क्रिय रुग्ण! 

देशात केवळ ७ लाख ८३ हजार स​क्रिय रुग्ण! 

Last Updated: Oct 18 2020 12:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख दिवसागणिक मंदावत आहे. रविवारी ही संख्या ७ लाख ८३ हजार ३११ (१०.४५%) एवढी होती. सक्रिय कोरोनारुग्णांच्या संख्येत घट होवून ही संख्या ६ लाखांवर पोहचेल, असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे. गेल्या एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत ११ हजार ७७६ ची घट नोंदवण्यात आली आहे, हे विशेष. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट तसेच कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत असले तरी, काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात ६१ हजार ८७१ कोरोनारुग्णांची भर पडली. तर, १ हजार ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ७४ लाख ९४ हजार ५५१ एवढी झाली आहे. यातील ६५ लाख ९७ हजार २०९ रुग्ण पुर्णत: कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १ लाख १४ हजार ०३१  कोरोना रुग्णांचा (१.५२%) मृत्यू झाला आहे. रविवारी देशाचा कोरोनामुक्तीचा दर ८८.०३% एवढा नोंदवण्यात आला.  सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रात गेल्या एका दिवसात १० हजार २५९ कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्रा पाठोपाठ केरळ (९,०१६), कर्नाटक (७,१८४), तामिळनाडू (४,२९५), आंधप्रदेश (३,६७६) तसेच पश्चिम बंगालमध्ये (३,८६५) कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली.

​शनिवारी नोंदवण्यात आलेल्या एकूण कोरोनामृत्यूपैकी ८६% मृत्यू हे १० राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले. सर्वाधिक मृत्यूची नोंद महाराष्ट्रात (४६३) घेण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तराखंड (९५), कर्नाटक (७१), पश्चिम बंगाल (६१), तामिळनाडू (५७), उत्तर प्रदेश (४०), दिल्ली (३५) तसेच केरळमध्ये (२६) कोरोनारुग्णांच्या मृत्यूचा आकडा लक्षणीय होता. देशात आतापर्यंत ९ कोटी ४२ लाख २४ हजार १९० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ९ लाख ७० हजार १७३ कोरोना तपासण्या या शनिवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. 

२२ राज्य, केंद्रशासित प्रदेशात २० हजारांहून कमी सक्रिय रुग्ण 

देशातील २२ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या २० हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, पंजाब, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच ईशान्य भारतातील राज्यांचा या यादीत समावेश आहे. तर, २० ते ५० हजार सक्रिय रुग्णसंख्या असलेले १० राज्य आहेत. तामिळनाडू, आंधप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगढ, तेलंगणा, राजस्थान तसेच ओडिशाचा त्यात समावेश आहे. केरळ (९६,१००) , कर्नाटक (१,१०,६६६) तसेच महाराष्ट्रात (१,८५,७५०) सर्वाधिक ५० हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 

 देशातील कोरोना 'पॉझिटिव्हीटी रेट' 

   दिनांक          तपासण्या      पॉझिटिव्हीटी रेट 
१) ११ ऑक्टो  ८,६८,७७,२४२       ८.१२% 
२) १२ ऑक्टो  ८,७८,७२,०९३       ८.१०% 
३) १३ ऑक्टो  ८,८९,४५,१०७        ८.०७%  
४) १४ ऑक्टो  ९,००,९०,१२२         ८.०४% 
५) १५ ऑक्टो  ९,१२,२६,३०५         ८.०१%  
६) १६ ऑक्टो  ९,२२,५४,९२७        ७.९९% 
७) १७ ऑक्टो  ९,३२,५४,०१७         ७.९७%  

 "