Wed, Apr 01, 2020 00:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांद्याचा भाव गडगडला; 135 रुपये किलोवर

कांद्याचा भाव गडगडला; 135 रुपये किलोवर

Last Updated: Dec 10 2019 12:51AM
नवी मुंबई : प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसांपासून आकाशाला गवसणी घालणार्‍या कांद्याच्या भावामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. सर्वसामान्यांना रडवणारा कांदा सोमवारी गडगडला असून नाशिकच्या घाऊक बाजारपेठेत प्रतिक्विंटल 3000 ते 3500 रुपयांनी दर घसरले आहेत. मुंबईत गेल्या आठवड्यात 90 ते 100 रुपये घाऊक बाजारात असलेले दर आता 50 ते 70 रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहेत. किरकोळ  बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा 135 ते 145 रुपये किलोने उपलब्ध झाला आहे. 

दिवसेंदिवस होणार्‍या दरवाढीने सर्वसामान्यांना रडवणार्‍या कांद्याची सोमवारी एपीएमसीच्या घाऊक बाजारात 100 गाड्यांची आवक झाली असून 9 हजार 700 क्विंटल कांदा दाखल झाला. त्यामुळे मध्यम कांदा 70 ते 90 रूपये किलो तर उत्तम एकनंबर पुणे जिल्ह्यातील ओतुर कांदा 130 रूपये किलो होता.

मुंबई एपीएमसीत गुजरात, नाशिक, पुणे (ओतुर) आणि तुरळक प्रमाणात कर्नाटक येथून कांद्याची आवक झाली. सर्वाधिक तेजी ओतुर कांद्याला होती. ओतुर कांदा 130 रूपये किलोने विक्री झाला. तर गुजरात कांदा हा मध्यम प्रतवारीत असल्याने 70 ते 90 रूपये किलोने विक्री झाला. तर दोन नंबर प्रतीचा कांदा 90 ते 120 रूपये किलोने विक्री झाला.

अतिवृष्टीचा फटका आणि जुन्या कांद्याचा अंतिम टप्प्यात असलेला साठा यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे घाऊक बाजारात दहा किलोमागे 200 ते 400 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याला प्रतवारीनुसार किलोला 60 ते 130 रुपये भाव मिळाला.

महागाईमुळे कांद्याला उठाव नसून किरकोळ खरेदीदारांनी पाठ फिरकल्याने विक्रीत  नेहमीपेक्षा 45 टक्के घट झाली आहे. आठ ते दहा किरकोळ विक्रेत्यांपैकी केवळ दोन ते तीन विक्रेते एक किंवा दोन पिशवी कांदा विक्रीसाठी ठेवू लागले आहेत. तोही कांदा हलक्या प्रतवारीचा असल्याने लवकर खराब होतो. तर मध्यम प्रतवारीचा कांदा 135 रूपयेपर्यंत विक्री होतो. ओतुरचा कांदा 150 रूपये किलोने किरकोळ बाजारात विक्री केला जात आहे.

घाऊक बाजारात तीन ते साडेतीन हजारांनी भाव घसरले

नाशिक जिल्ह्यातील मनमाड, निफाड, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, उभारणे, येवला, बागलाण,  वणीसह इतर बाजार समित्यांत सोमवारी नवीन कांद्याचे दर क्विंटलमागे 3000 ते 3500 रुपयांनी घसरले. गेल्या आठवड्यात नवीन कांदा 8500 ते 10 हजार रुपये क्विंटल भावाने लिलावात विक्री झाला होता. ओला कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्याने बाजारभाव पडले. मुंबई एपीएमसीत हेच दर 70 ते 90 रुपये होते. पुणे ओतुर  जुन्या कांद्याला मात्र 130 रुपये किलोने दर मिळाला.