होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कांदा @१४०

कांदा @ १४०

Last Updated: Dec 04 2019 1:13AM
नवी मुंबई : वार्ताहर

एपीएमसी घाऊक कांदा बाजारात सलग तिसर्‍या दिवशी कांद्याचे दर चढे राहिले  सोमवारी110 रुपये किलो असलेला कांदा  मंगळवारी आणखी 10 रुपयांनी वाढत 120 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ बाजारात हाच कांदा 125 रुपये किलोवरून थेट 135 ते 140 रुपयांवर पोहोचला. रोज भडकत चाललेला हा कांदा डोळ्यात पाणी आणू लागला आहे. ही दरवाढ आणखी आठवडाभर सुरु राहिल असा इशारा  घाऊक व्यापार्‍यांनी दिला.

एपीएमसी घाऊक बाजारात सोमवारी 95 ते 110 रुपये किलो असणारा कांदा मंगळवारी 90 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचला. हा दर या वर्षातील उच्चांकी ठरला आहे. 

घाऊक बाजारात सध्या अनेक ठिकाणांहून नवीन कांदा बाजारात येत आहे. मात्र या कांद्याची आवक कमीच आहे. शंभर सव्वाशे गाड्यांच्या जागी केवळ 60 ते 70 गाड्यांची आवक होत असल्याने बाजारात कांद्याची कमतरता आहे. मागणी नेहमीसारखी प्रचंड आणि पुरवठा मात्र कमी यातून कांद्याची महागाई सुरू झाली. बाजारात नवीन कांदा येत नाही आणि कांद्याची आवक वाढत नसल्याने दर उतरण्याची येण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
 
कांदा 135-140 वर पोहोचला आणि तो आणखी वाढण्याची चिन्हे असल्याने याचा थेट फटका घरच्या जेवणापासून ते गाडीवरच्या कांदाभजीपर्यंत झालेला दिसतो. वडापावच्या गाडीवर दिसणारी कांदाभजी काही दिवसांपासून गायब झालेली दिसतात. 

  किरकोळ व्यापार्‍यांच्या दरवाढीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने किरकोळ बाजारात दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्राहकांना चढ्या दराने कांदे खरेदी करावे लागत आहेत.

 कांदा रडू लागला असतानाच लसूणही स्वस्त राहिलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी 100 किलो दराने विकला जाणारा लसूण सध्या किरकोळ बाजारात 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. कांदा आणि लसूण हे मुंबईकरांच्या जेवणाला चव आणणारे महत्वाचे घटकच असे आवाक्याबाहेर गेले आहेत.